यंदा ‘व्हॅलेन्टाइन डे’ नाट्यप्रेमाचा !

सोळावं वरीस : समर्थ एकांकिका स्पर्धा 14 फेब्रुवारीपासून

सातारा – पाहता-पाहता सोळाव्या वर्षात पदार्पण करीत असलेली सातारची समर्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यावर्षी व्हॅलेन्टाइन दिनापासून म्हणजे 14 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा असा लौकिक प्राप्त केलेल्या या स्पर्धेस राज्यभरातून याहीवर्षी नेहमीप्रमाणेच उदंड प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास नाट्य परिषदेच्या सातारा शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साताऱ्यातील रंगकर्मींनी एकत्र येऊन उभी केलेली नाट्यचळवळ म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. व्यवस्थापनापासून अर्थकारणापर्यंत सर्वकाही रंगकर्मी स्वयंस्फूर्तीने करतात. राज्यभरातील रंगकर्मींना येथे आपुलकीची वागणूक मिळत असल्यामुळे, तसेच तज्ज्ञ आणि जाणकार परीक्षकांमुळे या स्पर्धेने अल्पावधीतच नावलौकिक मिळविला. स्पर्धेचे यंदाचे सोळावे वर्ष असून, स्पर्धा तीन दिवस चालणार आहे.

दरवर्षी राज्यभरातील किमान 50 ते 60 संघ या स्पर्धेसाठी नावनोंदणी करतात. तथापि, वेळेअभावी तीनच दिवस स्पर्धा घ्यावी लागत असल्यामुळे 30 ते 35 संघांनाच प्रवेश देता येतो. त्यामुळे राज्यातील स्पर्धकांनी लवकरात लवकर प्रवेश निश्‍चित करावा, असे आवाहन परिषदेचे कार्यवाह राजेश मोरे यांनी केले आहे.

यावर्षी सर्व सहभागी कलावंतांना सहभाग प्रमाणपत्र आणि प्रत्येक संघाला स्मृतिचिन्ह देण्यात येणार असून, गेल्या वर्षभराच्या कालावधीत ज्या कलावंतांनी विविध कलाप्रकारांमध्ये यश मिळविले आहे, त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे प्रसाद देवळेकर यांनी सांगितले. स्पर्धक संघांना 3 बाय 6 आकाराच्या 8 लेव्हल्स, 4 मोडे, 2 स्पॉट, 1 डीमर हे साहित्य विनामूल्य देण्यात येणार असून, त्याव्यतिरिक्त लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव स्पर्धक संघांनी करायची आहे.

परगावच्या संघांमधील किमान 8 जणांच्या चहापाणी व भोजनाची व्यवस्था नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे करण्यात येणार आहे. स्पर्धक संघांना नेपथ्य लावणे आणि काढणे यासह एक तासाचा वेळ सादरीकरणासाठी दिला जाईल.
सांघिक प्रथम क्रमांकाच्या संघास 11 हजार 16, दुसऱ्या क्रमांकास 8 हजार 16, तिसऱ्या क्रमांकास 5 हजार 16 अशा रोख पारितोषिकांसह आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याखेरीज उत्तेजनार्थ (3 हजार 16), शिस्तबद्ध संघ (1 हजार 516), नवीन संहिता (1 हजार 516), सर्वोत्तम स्थानिक संघ (1 हजार 516) अशी अन्य रोख पारितोषिके, स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. अभिनय (स्त्री आणि पुरुष), दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्‍वसंगीत. रंगभूषा व वेशभूषा या सर्व विभागांत 1016, 816 आणि 516 रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्वोत्तम बालकलाकार, लक्षवेधी अभिनय या विभागांसाठी 816 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धकांना लागणारे अन्य साहित्य (प्रॉपर्टी) आणि प्रकाशयोजनेचे साहित्य अल्प दरात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने केली असल्याची माहिती राजेश नारकर यांनी दिली. स्पर्धेच्या व्यवस्थापनासाठी रंगकर्मींच्या विविध समित्या तयार करण्यात आल्या असून, राजेश नारकर, राजीव मुळ्ये, मकरंद गोसावी, अजित करडे, माया भिसे, संदीप जंगम, धैर्यशील उत्तेकर, संदीप कुंभार, मंदार कोल्हटकर, गजानन वाडेकर, अमोल जोशी, सबनीस आढाव, किशोर तांदळे, हेमंत खळतकर, सिद्धार्थ निकाळजे, जयंत यादव, प्रशांत इंगवले, मंदार माटे, नितीन देशमाने, प्रसाद जोशी, सुनील बंबाडे, जमीर आतार, पंकज काळे, संयोगिता माजगावकर, मेघना होशिंग आदी रंगकर्मी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सक्रिय आहेत, अशी माहिती मनोज जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)