यंदा राज्यात ऊस उत्पादन घटणार

पुणे – राज्यातील साखर हंगामाला येत्या ऑक्‍टोबरपासून प्रारंभ होत आहे. मान्सूनने दिलेले दगा त्यामुळे राज्यावर असणारे दुष्काळाचे ढग त्यातच उसाच्या बहुसंख्य क्षेत्रावर झालेला हुमणी रोगाचा प्रार्दुभाव यामुळे राज्यात यंदा साखरचे उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. उसाचे उत्पादन क्षेत्र वाढले असले तरी साखर निर्मिती मात्र कमी होणार आहे.

गतवर्षीच्या गळीत हंगामा (2017-18) मध्ये राज्यातील 199 साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले होते. महाराष्ट्रात हंगामाच्या सुरूवातीला 15 लाख मे.टन साखरेचा शिल्लक साठा व हंगाम 2017-18 मधील उत्पादन 107.08 लाख टन साखर उपलब्ध होती. या उत्पादित साखरेपैकी राज्यात अंदाजे 24 लाख मे. टन साखरेचा खप व महाराष्ट्रातून सुमारे 50 लाख मे. टन साखर परराज्यात दिली तसेच तीन लाख मे. टन साखर निर्यात होण्याची अपेक्षा आहे. अशी एकूण 77 लाख मे. टन साखर विक्रीच्या धर्तीवर हंगामाच्या शेवटी 40 लाख मे. टन साखर शिल्लक राहील असे चित्र आहे. त्याचबरोबर चालू गळीत हंगामात उसाचे क्षेत्र वाढल्याने पुन्हा साखरेचे निर्मिती जास्त होणार असे चित्र दिसत होते, याबाबत अंदाज वर्तविताना साखर आयुक्तालयाने यंदा 110 मेट्रीक टनापेक्षा जास्त साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज काढला होता. पण मान्सूनने दिलेल्या हुलकावणीमुळे सगळेचे अंदाज फोल ठरले. म्हणजे क्षेत्रफळ वाढले पण साखरेचे उत्पादन घटणार असेच सध्या दिसत आहेत.

पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात पुरेसा पाऊस न झाल्याने उस पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात एकूण एक लाख 73 हजार 801 हेक्‍टरपैकी एक लाखाहून अधिक क्षेत्रावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

हवेली तालूक्‍यातील मांजरी बुद्रुक येथे साखर महासंघाची बैठक मागील आठवड्यात झाली. यावेळी साखर महासंघाकडूनही हुमणीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ही एक अडचण असताना कोल्हापूरसारख्या भागात सलग तीस दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे त्याठिकाणाचा उस हा धोक्‍यात आला आहे तर सांगलीत यावेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या पुर्व भागातील तालूक्‍यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पश्‍चिम विभागाचा विचार करताना सरासरी पाऊस कमी झाल्याने चिंता आणखी वाढली आहे. दौड, इंदापूर, पुरंदर तालूक्‍यात पाऊस पडलेला नाही. पिण्याचे पाणी कसे पुरवायचे हाच या भागात प्रश्‍न आहे त्यामुळे उस उत्पादनाबाबत काय करावे अशा विचारात सध्या शेतकरी आहे. यंदाच्या वर्षी केवळ धरणांच्या क्षेत्रातच चांगला पाऊस पडला त्यामुळे वेळेअगोदरच धरणे भरले परंतू प्रत्यक्षात विभागातील अनेक भागात पाऊस पडलाच नाही परतीच्या पावसाची आशाही संपली आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार सरासरीच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात 25 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ओल्या आणि कोरड्या अशा दोन्ही प्रकारच्या दुष्काळाचे संमिश्र चित्र दिसून येत आहे. त्याचवेळी आता गळीत हंगाम सुरु होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने थकबाकी असणाऱ्या कारखान्याचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)