यंदा भरभरून ‘आभाळमाया’

सरासरी 97 टक्के पावसाचा अंदाज : आगमनही जूनमध्येच
भारतीय हवामान खात्याने जाहीर केला पहिला अंदाज

पुणे – शेतकऱ्यांच्या दृष्टीने वरदान असणारा मान्सून अर्थात मोसमी पाऊस यंदा सरासरीइतका राहण्याचा दिलासादायक अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. यंदा देशात 97 टक्के पाऊस पडेल, असे भाकित वेधशाळेने वर्तविले आहे. त्यामुळे पीक-पाण्याच्या दृष्टीने देशाचे चित्र यंदा तरी दिलासादायक आहे. दरम्यान, गेल्याच आठवड्यात स्कायमेट या संस्थेने असाच सकारात्मक अंदाज वर्तवला होता. त्यामुळे भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

“यंदाचा मान्सून कसा राहणार’, याबाबतचा पहिल्या टप्यातील अंदाज दरवर्षी आयएमडीच्यावतीने एप्रिलमध्ये वर्तविण्यात येतो. सोमवारी दुपारी वेधशाळेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत यंदाच्या मान्सूनची माहिती सांगण्यात आली. गेल्या वर्षी आयएमडीने 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे देशभरात 95 टक्के पडला. त्याचप्रमाणे यंदा देशभरात सरासरी 97 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या अंदाजाप्रमाणे त्यात 5 टक्के कमी अधिक होण्याची शक्‍यता असल्याचेही आयएमडीने स्पष्ट केले आहे. ला-निनाच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती सुधारली असल्याने यंदा पाऊस चांगला राहणार आहे. त्यात जूनमध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ला निनाची स्थिती ही मे अखेरपर्यंत कायम राहणार आहे, त्यामुळे यंदाचा पाऊस जूनमध्ये दाखल होईल, असेही भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे.

अल-निनोचा परिणाम नाही
ला-निनो कधी निर्माण होईल, याबाबत काही निश्‍चित सांगता येत नाही. पण, तो तसाच राहिला तर भारतातील मान्सूनसाठी तो चांगले ठरणार असल्याचे आयएमडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ला-निनो कमजोर झाला, तर अल-निनो निर्माण होण्यास काही महिन्याचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे तो मान्सूनवर परिणाम करू शकणार नाही, असे ही सांगण्यात आले.

दुसरा अंदाज जूनमध्ये
भारतीय हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील मान्सूनचा अंदाज हा गेल्या काही वर्षातील देशभरातील पावसाची सरासरी आकडेवारी तसेच जानेवारी ते एप्रिल या कालवाधीमध्ये वाढलेले समुद्रातील तापमान आणि वाऱ्यांचा वेग, दिशा याचा अभ्यास करुन तयार करण्यात आला आहे. हा पहिल्या टप्यातील अंदाज जरी दिलासादायक असला तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात दुसऱ्या टप्यातील मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात येणार आहे. हा अंदाज जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पावसाचे भाकित सांगणारा असणार आहे.

नेमका अंदाज दुसऱ्या टप्प्यात
स्कायमेटने सुद्धा गेल्याच आठवड्यात दिलेल्या अंदाजानुसार देशात यंदा सरासरी इतका पाऊस पडले असे सांगितले होते. आता आयएमडीने सुद्धा अशाच प्रकारचे भाकित केल्याने सध्या उन्हाळा हा थोडा सुसह्य झाला आहे. गेल्या वर्षी जुन आणि जुलैमध्ये पावसाने थोडी उघडीप दिली होती. पण त्यानंतर परतीच्या मान्सूनच्या काळात पावसाने सगळी सरासरी भरुन काढली होती.आयएमडीने जरी पाऊस 97 टक्के बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला असला, तरी मान्सूनच्या चार महिन्याच्या काळात तो नक्की किती प्रमाणात पडेल, हे सांगणे आतातरी अवघड आहे. त्याचबरोबर देशाच्या कुठल्या भागात जास्त पडेल कुठे कमी पडेल, हे सुद्धा दुसऱ्या टप्यात स्पष्ट करता येणे शक्‍य होणार आहे. असे ही आयएमडीने सांगितले आहे.

सरासरी म्हणजे किती?
देशभरात साधाणरत; 890 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याच्या 19 टक्के कमी अधिक पाऊस पडला, तरी तो सरासरी इतका मानला जातो. 2017 मध्ये 100 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तर 2016 मध्ये सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पडेल, असे वर्तविण्यात आले होते. त्यानंतर 2014 मध्ये सरासरीच्या 12 टक्के कमी म्हणजे 781.8 तर 2015 मध्ये सरासरीच्या 14 टक्के कमी म्हणजे 760.6 मिलीमीटर एवढा पाऊस पडला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)