यंदा गणपती बप्पासाठी कापडी मखर

थर्माकोल बंदीचा परिणाम

सातारा,दि.24 प्रतिनिधी- गणपती बप्पाच्या आगमनासाठी आता काही दिवस शिल्लक राहिलेले असताना बाजारपेठा देखील सजावटीच्या साहित्याने बहरू लागल्या आहेत. मात्र यंदाच्या वर्षी सजावट साहित्यामध्ये एक बदल दिसू लागला आहे. तो म्हणजे गेली वर्षानुवर्ष गणपती बाप्पा दिमाखात ज्या थर्माकॉलच्या मखरांमध्ये विराजमान झालेले असायचे त्या मखराचे स्वरूप यंदाच्या गणेशोत्सावत प्रथमच बदलले असून यंदाच्या वर्षी थर्माकोलच्या मखरांची जागा कापडी मखरांनी घेतलेली दिसून येत आहे.

मागील काही महिन्यांपुर्वी प्लास्टिकसह थर्माकॉलवर देखील बंदी घालण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेताना केवळ टिव्ही, फ्रीज आदी.साहित्यांच्या पॅकींगसाठी थर्माकॉल वापरण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतु या निर्णयाचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवात दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून घरगुती तसेच छोट्या मंडळांमध्ये गणपतींसाठी थर्माकॉलच्या माध्यमातून आकर्षक मखरे तयार करण्याची परंपरा होती. मात्र, त्या परंपरेला यंदाच्या गणेशोत्सवात थर्माकॉल बंदीमुळे छेद निर्माण झाला आहे. यंदाच्या वर्षी साताऱ्यातील बाजारपेठेत अद्याप कोठेही थर्माकोलची मखरे विक्रीसाठी उपलब्ध झालेली नाहीत. उलट पर्यायी कापडी मखरे बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध झालेली दिसून येत आहेत. शहरातील राजपथ, राधिका रोड, मोती चौक आदी.ठिकाणी कापडी मखरे विक्रीस उपलब्ध झालेली आहेत. थर्माकॉलच्या तुलनेत कापडी मखरांच्या किंमती थोड्या फार प्रमाणात अधिक आहेत. घरगुती गणपतीसाठी दिड हजारपासून ते तीन हजार रूपयांपर्यंतची मखरे बाजारपेठेत उपलब्ध झाली आहेत. मखरे आकर्षक दिसावी यासाठी सॅटीन कापडाचा वापर करण्यात आला असून मखर उभारणीसाठी पीव्हीसी पाईपचा वापर करण्यात आला आहे. मखरे सहज घरी नेता यावी यासाठी फोल्ड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या शहरात मखरे पाहण्यासाठी तसेच विकत घेण्यासाठी देखील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसून येत असून जसजसा गणेशोत्सवाचे आगमन नजीक येईल तसतसा मखरे खरेदीचा जोर वाढणार आहे.

यापुर्वी काही प्रमाणात घरगुती गणपतीसाठी कापडी मखरे आणली जायची. मात्र, यंदाच्या वर्षी सरकारने थर्माकोल बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कापडी मखरे घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्याचबरोबर शासनाने थर्माकोल बंदीचा निर्णय घेतल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण देखील होणार आहे. तसेच थर्माकोल ऐवजी कापडी मखरे टिकावू असून कापडी मखरे सहजरित्या घरी नेता येणार असल्याने ग्राहक देखील कापडी मखरे खरेदीस प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करित आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)