यंदा कामगारांच्या बोनसमध्ये कपात

मंदीचे कारण ः चाकण उद्योग पंढरीतील स्थिती

वाकी-वाहन उद्योगाची पंढरी म्हणून अल्पावधीत नावारुपास आलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या जीवावर मोठ मोठे कारखानदार, उद्योगपती कारखाने, कंपनी, छोटे मोठे वर्कशॉर्प चालवून बक्कळ संपत्ती कमवतात; मात्र ऐन दिवाळीत कामगारांना कामगारांच्या मनासारखा बोनस न देता कपात केली जात असल्याने कामगार वर्गामध्ये असंतोष खदखदत आहे. याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर काही कामगारांनी खंत व्यक्‍त केली.
चाकण व परिसरात छोटे मोठे कारखाने असे एकुण आठशे पेक्षा जास्त कंपन्या व कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये देशाच्या व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोटाची खळगी भरण्याकरिता अनेक कामगार वास्तव्यासाठी चाकण भागात आले आहेत. काही कामगार खोली भाड्याने घेऊन राहत आहेत. तर काही चार-चार कामगार एकत्रित येऊन खोली घेऊन भाड्याने राहत आहेत. कंपनी चालक हे कामगारांच्या माध्यमातून हवे तेवढे व कमी कालावधीत भरपूर उत्पन्न तयार करून घेतात. याचा फायदा कंपनी चालक व कारखानदार यांना होतो. कंपनीत कायम करतो, पगार वाढवितो, नवनवीन सुविधा पुरवितो अशी आमिषे दाखवून कामगारांच्या जीवावर या भागातील कारखानदार बक्कळ संपत्ती कमावतात; मात्र तसे काही होत नसल्याची वस्तूस्थिती लपून राहिलेली नाही. नुसती आश्वासने दाखविली जातात.
मात्र काही मोजकेच कारखानदार कामगारांच्या भावनांची कदर करून सढळ हाताने कामगारांना रोख रकमेसह मिठाई, आकर्षक वस्तू, कपडे, जेवणाचे डबे असा मनासारखा बोनस देऊन कामगारांच्या सुखदुःखात सहभागी होतात; परंतु बरेचसे कारखानदार व कंपनी चालकांनी मंदीच्या नावाखाली यावर्षी कामगारांच्या बोनसमध्ये कपात केली आहे. विशेष म्हणजे कारखाने उभारण्यासाठी ज्यांच्या कवडी मोल जागा अथवा जमिनी कारखानदारांनी घेतल्या, त्यांनाही फसवी आश्वासने देऊन त्यांना कामावर घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या भागातून होत आहे. भविष्यात कामगारांच्या बोनसवर संक्रात आणल्यास कामगार मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)