तंत्रशिक्षण, वैद्यकीय अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेश प्रक्रियावरून झाले स्पष्ट

पुणे – राज्यातील तंत्रशिक्षण व वैद्यकीय अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे राज्य सीईटी कक्षाने शुक्रवारी (दि.7) जाहीर केले. राज्य सीईटी कक्षाने प्रसिद्ध केलेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवरून यंदा राज्यात अभियांत्रिकीचे तब्बल 66 हजार प्रवेश रिक्‍त राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य सीईटी कक्षाचे आयुक्‍त आनंद रायते यांनी सांगितले, शुक्रवारी तंत्रनिकेतन व वैद्यकीयच्या सर्व प्रवेश प्रक्रिया दि. 31 ऑगस्ट रोजी पूर्ण झाली आहे. सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संगणकीकृत असल्याने पारदर्शी पद्धतीने सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, संस्थानिहाय, प्रवर्गनिहाय माहिती, गुणानुक्रम, कट ऑफ गुण इत्यादी विषयक संपूर्ण माहिती प्रत्येक प्रवेश फेरीनिहाय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता स्वतंत्रपणे हेल्पलाईन आणि संपर्क अधिकाऱ्याची नेमणूक केली होती, असेही रायते यांनी म्हंटले आहे.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांपैकी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता राज्यातील एकूण 347 संस्थांमधून 73 हजार 934 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर, अन्य अभ्यासक्रमांसाठी 1 लाख 20 हजार 836 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय आणि शासनमान्यता प्राप्त आणि महानगर पालिकेच्या एकूण 23 महाविद्यालयातील 3 हजार 160 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर, खासगी विनाअनुदानित 16 संस्थांमध्ये 1 हजार 820 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उच्च शिक्षण, आयुष, कृषी विषयक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे रायते यांनी सांगितले.

शैक्षणिकदृष्ट्या चितेंची बाब
राज्यात अभियांत्रिकीची यंदा 1 लाख 40 हजार 43 एवढी प्रवेशाची क्षमता होती. यावर्षी अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी 1 लाख 8 हजार 313 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू असताच 31 हजार 730 अभियांत्रिकीच्या जागा रिक्‍त राहिल्या आहेत. आता संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, अखेर अभियांत्रिकीच्या 73 हजार 934 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यावरून यंदा अभियांत्रिकीच्या 66 हजार 109 जागा रिक्‍त राहात आहेत. ही बाब शैक्षणिकदृष्ट्या चितेंची म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)