पुणे: महापालिका शाळांत मुलांना गणवेश देण्यास ऑगस्ट उजाडणार

पुणे – जुन्याच ठेकेदारांना हाताशी धरून, पुन्हा एकदा गणवेशाचा ठेका त्यांनाच देण्याचा घाट महापालिका प्रशासन आणि काही पदाधिकाऱ्यांकडून घातला जात आहे. या सगळ्या जुगाडात डीबीटी कार्ड देण्याचा विषय पुढे ढकलण्यात आला असून, यावर्षीही महापालिका शाळांतील मुलांच्या नशीबी ऑगस्टमध्येच गणवेश मिळणार अशी स्थिती निर्माण करण्यात आली आहे.

शिक्षणमंडळ आणि नवे शैक्षणिक वर्ष म्हटल्यानंतर गणवेश, शालेय साहित्य आणि पावसाळी कपडे हा घोटाळा पाचवीलाच पुजला आहे. यावर्षीही हा घोटाळा करण्याचा घाट घातला जात असून, नाकारलेल्याच ठेकेदारांना पुन्हा आणण्याचे प्रयत्न प्रशासन आणि काही पदाधिकाऱ्यांकडून केले जात असल्याचे उघडकीला आले आहे.

गणवेश वाटपात घोटाळा होऊ नये, त्यात पारदर्शिता यावी म्हणून डीबीटी कार्डची संकल्पना आणण्यात आली. त्याविषयीही मागच्यावर्षी ओरड झाली. त्यामुळे यंदा डीबीडी कार्डमध्ये काय सुधारणा करणार, यावर्षीतरी वेळेत गणवेश मिळतील का असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. मात्र जुन्याच ठेकेदारांची मोळी बांधण्याचा घाट घातला जात असल्याने आणि त्यामुळेच डीबीटीचा विषय पुढे ढकलण्यात आल्याने पर्यायाने गणवेशही उशीराच मिळणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

गणवेश क्वालिटीबाबत तक्रारी आल्याने राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे दिलेल्या प्रस्तावानुसार शिक्षणविभागाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाकडूनच गणवेश घेण्यासंबंधीच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र तो विषय डावलून डीबीटी मध्येदुकानदारांचे नवे पॅनल तयार करून, त्यांच्यात स्पर्धा निर्माण करून गणवेश वाटपाची योजना महापालिका राबवत आहे. मात्र यात नमूद ठेकेदारांमध्ये आधीच ब्लॅकलिस्टेड केलेले ठेकेदार आहेत.

या सगळ्याची परिणती ही मुलांना उशीरा गणवेश मिळण्यातच होणार आहे. याविषयी सोमवारी महापालिका मुख्यसभेत विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी प्रश्‍न विचारला होता मात्र अद्याप हा विषय आला नाही. तो स्थायी समितीमार्फत येईल असे वरवरचे उत्तर देऊन त्यांची बोळवण करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)