यंदापासूनच ईबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ

60 गुणांची अटही शिथिल ः उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून आदेश जारी

मुंबई,  – आर्थिक दुर्बल घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेतंर्गत ईबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी असलेली 60 गुणांची अट शिथिल करून ती 50 टक्के केली आहे. ही अट चालू शैक्षणिक वर्षांपासूनच लागू करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने त्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. या मोर्च्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 35 ऐवजी 605 अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्याचे मान्य करण्यात आले. शिष्यवृत्तीसाठी असलेली 60 टक्के गुणांची अट कमी करून ती 50 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने शुक्रवारी लगेच यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. शिष्यवृत्ती योजनेंतर्गत कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि वैद्यकीय शिक्षण औषधद्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील व्यावसायकि अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी लाभाच्या पात्रतेची किमान 60 टक्के गुणांची विहित केलेली अट शिथिल करण्याबाबतचे आदेश या विभागांनी त्यांच्या स्तरावर तात्काळ निर्गमित करावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)