यंदाच्या शिक्षक प्रशिक्षणाने काय साधले?

– श्रद्धा कोळेकर

पुणे – एखादी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आणि ती रेकॉर्डवर आणण्यासाठी आपल्याकडे काय केले जाईल, याचा नेम नाही. शाळा सुरू होऊन चार महिने झाले, तरीही राज्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण होत नाही अशी ओरड वाढल्यानंतर शिक्षण विभागाने टीव्हीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा घाट घातला. डिजिटल महाराष्ट्र म्हणून मिरवणाऱ्या राज्याला साजेसा असा प्रशिक्षण कार्यक्रमही झाला; परंतु त्यातून खरोखरच शिक्षकांना शंभर टक्‍के प्रशिक्षण मिळाले का, हा प्रश्‍न कायम आहे.

-Ads-

राज्य परीक्षा परिषदेने आजवर राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक प्रयोग केले आहेत. कधी प्रशिक्षणाच्या सीडीज्‌ वाटल्या, कधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, तर कधी थेट टीव्हीवरुन प्रशिक्षण दिले. मात्र, यातील बहुतांशी प्रशिक्षण फसल्याचेच दिसले. यंदाचेही प्रशिक्षण असेच काहीसे एकतर्फी असल्याचे समोर आले आहे.

कोणीतरी काहीतरी बोलावे आणि आपण प्रश्‍न न विचारता ते निमूटपणे ऐकावे. प्रश्‍न पडले तरीही शांत बसावे, असेच यंदाचे शिक्षकांचे प्रशिक्षणही झालेले दिसले. एकीकडे शिक्षण विभाग “इंटरअॅक्‍टिव्ह कम्युनिकेशन’वर भर देत विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये मिसळून शिकवण्याचे आवाहन करत आहे आणि दुसरीकडे बरोबर याच्या उलट कृती करत स्वत: मात्र औपचारिकता करत प्रशिक्षणे घेत असल्याचे दिसत आहे.

एखादा नवा अभ्यासक्रम आला असेल, तर तो आणण्यामागे शिक्षणतज्ज्ञांनी नेमका कोणता विचार केला यापासून त्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्‍नांचे मूल्यांकन कसे करावे, आदीपर्यंत शिक्षकांना अनेक प्रश्‍न पडलेले असतात. परंतु “वंदे गुजरात’ या वाहिनीवरुन देण्यात आलेल्या प्रशिक्षणात असा कोणताही संवाद झाला नाही. शिक्षकांचे प्रश्‍न त्यांच्या मनातच राहिले. त्यामुळे अर्थातच ज्या प्रश्‍नांची उत्तरे शिक्षकांकडेच नाहीत, त्या प्रश्‍नांची उत्तरे शिक्षक तरी कशी विद्यार्थ्यांना देणार, असा प्रश्‍न निर्माण होतो आहे. त्यामुळेच आधीच चार महिने उशिरा दिलेल्या या नव्या अभ्यासक्रमावर आधारित शिक्षकांच्या प्रशिक्षणाने नेमके काय साधले असा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)