यंदाच्या निवडणूकीतील खर्चावर येणार बंधन

राजकीय पक्षांना स्वतंत्र बॅंक खाते बंधनकारक

मुंबई : राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, या निवडणुकीतील सर्वच खर्चाचा हिशोब राजकीय पक्षांना दाखवावा लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडण्याची सक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या खर्चावर बंधन आणण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केला आहे.
या निवडणुकांदरम्यान खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्याबाबत न्यायालयाचे आदेश बंधनकारक राहतील, असेही आयोगाने यावेळी स्पष्ट केले. निवडणूक संपल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने 30 दिवसांच्या मुदतीमध्ये निवडणुकीच्या खर्चाचा तपशील आयोगापुढे सादर करणे बंधनकारक आहे. राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी केलेल्या निवडणूक खर्चाचा तपशील 60 दिवसांत सादर करावा लागणार आहे. याशिवाय, या निवडणुकांसाठी प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार आहे. निवडणुकीचा खर्च त्यामधूनच करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे आणि नाशिकसह राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. या घोषणेनंतर निवडणूक क्षेत्रांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीदरम्यान, आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाकडून विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. मतदारांना कोणत्याही प्रकारे भुलवणे किंवा त्यांना आकर्षित करण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)