यंदाचे फिरोदिया पुरस्कार जाहीर

संदीप त्रिवेदी, प्रा. सत्यजित मेयर, नंदन निलेकणी यंदाचे मानकरी
 
पुणे – विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा एच. के. फिरोदिया पुरस्कार यंदा मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे (टीआयएफआर) संचालक प्रा. संदीप त्रिवेदी आणि बेंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सचे (एनसीबीएस) संचालक प्रा. सत्यजित मेयर यांना जाहीर झाला आहे. तसेच, “इन्फोसिस’चे सहअध्यक्ष नंदन निलेकणी यांना एच. के. फिरोदिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी ही घोषणा केली. या प्रसंगी जयश्री फिरोदिया, प्रा. के. सी. मोहिते, दीपक शिकारपूर उपस्थित होते. देशातील विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांना दरवर्षी एच. के. फिरोदिया पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदाच्या विज्ञानरत्न पुरस्कारासाठी प्रा. त्रिवेदी यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. त्रिवेदी हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असून, स्ट्रिंग थिअरीवर त्यांनी संशोधन केले आहे. विश्‍व रचनाशास्त्र, पार्टीकल फिजिक्‍स या विषयातील त्यांच्या संशोधनाला देश-विदेशात अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

विज्ञान भूषण पुरस्कारासाठी जीवशास्त्रज्ञ प्रा. मेयर यांची निवड करण्यात आली आहे. “सेल मेम्ब्रेन’चे (पेशी कवचाचे) कार्य कसे चालते याविषयावर प्रा. मेयर यांचे संशोधन आहे. त्यांनाही देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाले असून, यूएस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते फेलो आहेत.

आधार कार्ड आणि देशातील कॅशलेस व्यवहारांच्या प्रसारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल “इन्फोसिस’चे निलेकणी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. फिरोदिया पुरस्कारांचे यंदाचे तेवीसावे वर्ष आहे. 1 फेब्रुवारीला बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी सहा वाजता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. या प्रसंगी पुरस्कारविजेत्या शास्त्रज्ञांची व्याख्यानेही होणार आहेत.

शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी

फिरोदिया पुरस्कारांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावर आधारीत ऑनलाइन प्रश्‍नमंजुषा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्याचे फिरोदिया यांनी सांगितले. पाऊण तासाच्या ऑनलाइन प्रश्‍नमंजुषा स्पर्धेमध्ये यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी यानिमित्ताने मिळेल. तसेच सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमात बक्षिसे देण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. सहभागासाठी www.quizhkfirodiaawards.org या वेबसाईटवर नाव नोंदणी करता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)