म.फुले यांच्या विचारामुळे लोकशाही प्रक्रीया व्यवस्थीत : संजीवराजे

कटगूणःमहात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना संजिवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर. (छाया : प्रकाश राजेघाटगे)

कटगुण येथे म.फुले यांना आदरांजली

बुध दि. 28(प्रतिनिधी)- महात्मा फुले यांनी त्या काळात पुरोगामी विचाराने काम केल्यामुळे आज त्यांच्या विचाराने प्रेरीत होऊन आपल्या देशातील लोकशाही प्रक्रीया व्यवस्थितपणे काम करत आहे. यातून या महामानवाच्या विचारात असलेल्या ताकदीची प्रचिती येते. ज्या भूमित या महामानवाचा जन्म झाला तिला विकासात्मक कोणतीच गोष्ट कमी पडू देणार नाही,असे अभिवचन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.

कटगुण (ता.खटाव ) येथे महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी निमित्त आयोजित समारंभात ते अध्यक्ष म्हणूण बोलत होते. याप्रसंगी सरपंच जयश्री गोरे, नामदेव ननावरे,शिक्षण सभापती राजेश पवार,समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगौड,महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे,जि.प.वित्त अधिकारी धमेंद्र काळोखे,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते,पंचायत समिती सभापती कल्पना मोरे,उपसभापती संतोष साळुंखे,जिल्हा परिषद सदस्य सुनिता कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.

निंबाळकर पुढे म्हणाले, कर्मठ विचारांच्या लोकांचे केंद्रबिंदू म्हणूण संपूर्ण देशात एके काळी पुण्याची ओळख होती. अशा शहरातून सर्वसामान्यांना व खासकरून महिलांना शिक्षण देण्याच्या दृष्टीने महात्मा जोतिबा फुले यांनी प्रवाहाच्या विरुध्द जात शिक्षणाची मुहर्तमेढ रोवली . त्या महामानवाचा जन्म आपल्या जिल्ह्यात कटगुण गावात होणे हे आपल्या सातारकरांसाठी खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. आज फुले दांपत्यांना कोणत्यातरी एखाद्या जातीय चौकटीत डांबून न ठेवता समाजातील सर्वसोशित घटकांच्या हक्कासाठी लढणारे महामानव म्हणूण आपण त्यांची नोंद घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर पहिला पोवाडा रचणारे व रायगडावरील समाधीचा शोध लावणारे म्हणूण महात्मा फुले यांची इतिहासात नोंद आहे.

नामदेव ननावरे, शिवाजी सर्वगौड,राजेश पवार,कल्पना मोरे,प्रदीप विधाते,लक्ष्मणराव पिसे,उदय कदम,प्रा.प्रल्हाद गायकवाड,सुधिर गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच जयवंत फाळके, मीना जावळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजित चव्हाण , प्रास्ताविक उपसभापती संतोष साळुंखे , आभार प्रा. गायकवाड यांनी मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)