म्हाळुंगेत 4 हजार 800 गरजूंना श्रवण यंत्रचे वाटप

पिरंगुट- म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या मोफत श्रवणतंत्र वाटप शिबिरात 4 हजार 800 गरजूंना श्रवण यंत्र बसवण्यात आले. ही संख्या जागतिक विक्रम प्रस्थापित करणारी ठरली आहे. याची नोंद “गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली आहे.
स्टार्की हिअरींग फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट पवार चॅरीटेबल ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप, आरव्हीएस एज्युकेशनल अँड चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, स्टार्की हिअरिंग फाउंडेशनचे अध्यक्ष विल्यम ऑस्टिन, सहसंस्थापक टीम ऑस्टिन, स्टार्की इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रोहित मिश्रा, स्टार्की हिअरिंग फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय विकास अधिकारी सुरेश पिल्लई, टाटा ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी आर. वेंकटरमण, मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या कल्याणी मांडके, पुणे जिल्हा अपंग केंद्राचे प्रकल्प संचालक नंदकुमार फुले, ठाकरसी ग्रुपचे महेश जोशी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उद्योजक विठ्ठल कामत, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी कसोटी क्रिकेटपटू रवी शास्त्री, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान-अपंग हक्क विकास मंचचे संयोजक विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, विश्वास ठाकूर, निलेश राऊत आदी उपस्थित होते.
या शिबिरात एकूण 6 हजार जणांना श्रवण यंत्र वाटप करण्याचे नियोजन होते. शिबिराच्या काळात 4800 एवढी श्रवणयंत्रे जोडण्याचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. या अगोदर 3911 जणांना श्रवणयंत्र जोडण्यांची नोंद आहे.
याबाबत शरद पवार म्हणाले, एकाच छताखाली इतक्‍या मोठ्या संख्येने श्रवणयंत्रे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. याची जागतिक विक्रमामध्ये नोंद होण्याची शक्‍यता आहे. जागतिक दर्जाचा उपक्रम पार पडला याचा आनंद वाटतो.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि स्टार्की फाऊंडेशनच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले तेंव्हा स्टार्की फाऊंडेशनने आम्हाला सवलतीच्या दरात श्रवणयंत्रे उपलब्ध करुन दिली. त्यानंतर टाटा ट्रस्ट आणि इतर संस्थांच्या मदतीने कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे उपलब्ध करुन देण्यात आली. कर्णबधीरांना आयुष्यात प्रथमच ध्वनी ऐकायला मिळतो तेव्हा त्यांना मिळणारा आनंद हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)