म्हाडाच्या वसाहतीमधील इमारती मोडकळीस

रहिवासी दहशतीत : पुनर्विकास तातडीन मार्गी लावण्याची मागणी

– महिनाभरात निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पुणे – येरवडा येथील म्हाडाच्या वसाहतीमधील इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे हजारो रहिवासी दहशतीच्या वातावरणात आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास तातडीने मार्गी लागावा यासाठी रहिवाशांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. येत्या महिनाभरात यासंदर्भात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

-Ads-

पुणे शहर सर्व म्हाडा वसाहती फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. फेडरेशनचे अध्यक्ष राजकुमार खोपकर, सरचिटणिस डी. के. जाधव, खजीनदार एम. आर. चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. येरवडा येथील धर्मवीर संभाजीनगर आणि महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे म्हाडाच्या दीडशे इमारती असून त्यामध्ये साडेचार हजार फ्लॅट आहेत.

या इमारतींचे बांधकाम 1982 साली करण्यात आले आहे. त्याला तब्बल 36 वर्षांहूनही अधिक काळ झाला असल्याने त्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासासाठी फेडरेशनच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला आहे. येथील कोणत्याही इमारतीची पडझड होऊन जीवितहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

दुरुस्ती जुजबी पण धोका कायम!
लातूरमध्ये 1993 साली भूकंप झाल्यानंतर या परिसरातील एल-44 ही इमारत खचली होती. त्यामुळे पुणे म्हाडाच्या वतीने या इमारतीच्या पायाखाली शंभरपेक्षा अधिक ट्रक्‍स रॅबिटची भर घालून खचलेल्या भागातील सर्व कोपऱ्यांना आधार दिला होता, त्यानंतर प्लॅस्टर करून जुजबी दुरुस्ती केली आहे. त्यानंतरही बहुतांशी इमारतींची पडझड होऊन छोट्या मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिक भीतीच्या वातावरणात राहात आहेत. यापुढील कालावधीत अशा काही दुर्घटना घडल्यास त्याला राज्य शासन जबाबदार राहील, असा इशाराही फेडरेशनच्या वतीने देण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)