बिदाल, दि. 8 (प्रतिनिधी) – सातारा – टेम्भुर्णी रस्त्यावर म्हसवड व कासारवाडी परिसरात ठेकेदाराने केलेल्या रस्त्याच्या मोडतोडीमुळे रस्ता धोकादायक झाला आहे. संबंधित ठेकेदार गुंडांना हाताशी धरून ग्रामस्थांचा विरोध मोडून काढत आहे. याप्रकरणी प्रशासनाने कारवाई करून रस्ता व्यवस्थीत करण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, या मार्गावर
बुधवारी रात्री अपघात होवून युवक गंभीर जखमी झाला आहे.
म्हसवड-माळशिरस रस्त्याचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित आहे. या रस्त्याने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून डॉ. प्रमोद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. तसेच प्रशासकीय पातळीवर जिल्हा आणि राज्यस्तरीय अनेक बैठका झाल्या. राज्याचे बांधकाम मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सोबत शेतकऱ्याच्या झालेल्या बैठकीत जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवले जाईल असे आदेश दिल्यानंतरही ठेकेदार स्थानिक गुंडांना हाताशी धरून दमदाटी करून रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात बाधित शेतकऱ्यांनी म्हसवड पोलिस ठाणे आणि प्रांत अधिकारी माण-खटाव यांना वारंवार लेखी निवेदन देऊन संबधित ठेकेदार आणि गुंडावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तरीही ठेकेदारांची दादागिरी सुरू असल्याने शेतकरी बांधवांमधून संतापाच्या भावना व्यक्त होत आहे. हा रस्ता ठेकेदाराने खणल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून रस्ता व्यवस्थित करण्याची मागणी म्हसवड मासाळवाडी, हवालदारवाडी,कासारवाडी, भाटकी, कारखेल या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)