म्हसवडचे दिवाळी मैदान उत्साहात साजरे

म्हसवड ः श्रीसिध्दनाथाच्या मंदिरातून शिलंगणास प्रारंभ झाल्यानंतर भाविकांची झालेली गर्दी. (छाया : नागनाथ डोंबे)

म्हसवड, दि. 9 (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले म्हसवडचे दिवाळी मैदान फटाक्‍याच्या अतिषबाजीत मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. मैदान उत्सवात फटाक्‍यांची अतिषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आतषबाजीमुळे माणगंगेचे मैदान उजळून निघाले.
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यातील अनेक भक्ताचे कुलदैवत व म्हसवड नगरीचे श्रध्दास्थान ग्रामदैवत श्रीसिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या पारंपारिक पध्दतीचा एक महिना सुरू असलेल्या विवाह सोहळ्यास दिपावली पाडव्याच्या अभंग्यस्नानाच्या पहाटे सिध्दनाथ जोगेश्वरी यांच्या आरती नंतर मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात श्रींचे घट बसवून समई पेटवण्यात आल्या. दिवाळी पाडव्या दिवशी श्रीचा हळदी सोहळा पार पडला. यावेळी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या म्हातारदेवासमोर समई लावून घटस्थापना करण्यात आली. आज भाऊबीजेच्या दिवशी याच म्हातारदेवाचे दुसरे पुरातन मंदिर असलेल्या राज्यांच्या बागेतील म्हातारदेवाची आरती मंदिरातील सालकरी व भक्तगणांच्या उपस्थित करण्यात येवून पुन्हा हे देवाचे शिलंगण माघारी मंदिरात आले. हे शिलंगण मंदिरातून सुरू होऊन पुन्हा मंदिरात पोहचण्यासाठी देवाची शहर प्रदक्षिणा होते आणि याच वेळी शहरातील नागरीकांनी देव आपल्या दारत येत असल्याने मोठ्या उत्साहात या शिलंगणासमोर म्हणजे देवासमोर फटाक्‍यांची मोठी अतिषबाजी करून देवाचे स्वागत करण्यात आले. यावेळी रामोशी वेशीतून सुरू झालेले हे शिलंगण मुख्य पेठेतून मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी तब्बल दहा तास लागले. हे शिलंगण सुरू होऊन मंदिरापर्यंत पोहचण्यादरम्यान जो वेळ लागतो व याच वेळेत जी फटाक्‍यांची अतिषबाजी केली जाते ती अतिषबाजी बघण्यासारखी होती. यावेळी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून
भाविक म्हसवडचे हे खास परंपरागत प्रसिध्द असलेले दिवाळी मैदान पाहण्यासाठी आले होते. राज्याच्या बागेत म्हातारदेवाची आरती करून सायंकाळी 7 वाजता हे मैदान रामोशी वेशीतून सुरू झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर फटाक्‍यांची अतिषबाजी केली. यात लहान मुलांसह तरूणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. हे मैदान सिद्धनाथ मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी पहाटेच्या चार वाजल्या. महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले म्हसवडचे हे परंपरागत फटाक्‍यांची अतिषबाजी होत असलेले दिवाळी मैदान पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होते.

महाराष्ट्रात कोठेही येवढ्या मोठ्या प्रमाणात फटाक्‍यांची अतिषबाजी होत नाही तेवढी मोठी फटाक्‍यांची अतिषबाजी देव दारात आल्यावर भाविक करत असतात. माण तालुक्‍यात नेहमीच दुष्काळ पडतो. मात्र या दुष्काळाला खंबीरपणे तोंड देण्याची ताकत शहराचे ग्रामदैवत असलेले श्रीसिध्दनाथच देत असतात. त्यामुळे हा आमचा देव आमच्या दारात आल्यावर आम्ही एकवेळी दिवाळीचा फराळ कमी करू मात्र देवाचे स्वागत हे मोठ्या उत्साहात फटाक्‍यांच्या अतिषबाजीतच केले जाते.
शिवदास केवटे, भाविक

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)