म्हणून तिने प्रियकराच्या लग्नाचा मांडवच जाळला

महिलेला अटक; दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याच्या रागातून प्रकार
पुणे  – प्रियकराने लग्नास नकार देत दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याच्या रागातून प्रेयसीने प्रियकराची दुचाकी, रिक्षा आणि लग्नासाठी घरासमोर घातलेला मांडव पेटवून दिल्याचा
धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी संबधीत महिलेला सापळा रचून अटक केली. सुषमा गणपत टेमघरे (वय 36, रा. शनिनगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी (दि. 17) शनीनगर परिसरात एक दुचाकी, रिक्षा आणि लग्नासाठी घरासमोर घातलेला मंडप जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्याचा तपास सुरू असताना शनिनगर भागात झालेला जळीत प्रकार एका महिलेने केला असून ती दत्तनगर येथील डी मार्टजवळ उभी असून ती पळून जाण्याच्या तयारीत आहे. तिने निळया रंगाचा कुडता, गुलाबी रंगाची सलवार परिधान केलेला आहे. अशी महिती खबऱ्याकडून मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास
पथकाने घटनास्थळी सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले.
तिला विश्‍वासात घेऊन तिच्याकडे अधिक चौकशी केली असता सुषमा हीनेच शनीनगर परिसरातील दुचाकी, रिक्षा व लग्नासाठी घरासमोर घातलेला मांडव जाळल्याची कबुली दिली. दिपक हरिभाउ रेणुसे (रा. शनिनगर) आणि संबधीत महिलेचे प्रेमसंबंध होते. तो शनीनगर भागातच राहण्यास आहे. परंतु दिपकने लग्न करण्यास नकार देत दुस-या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचा राग मनात धरुन एके दिवशी रात्री त्याची दुचाकी जाळली व दोन दिवसांनी त्याच्या लग्नाच्या मांडवावर रॉकेलचे पेटते बोळे टाकल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. ही कारवाई परिमंडळ 2 चे उपायुक्त प्रविण मुंडे, सहाय्यक आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) वाघचवरे तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक समाधान कदम, कर्मचारी अमोल पवार, कुंदन शिंदे, महेश मंडलीक, अरुण मोहिते, उज्वल मोकाशी,सर्फराज देशमुख, गणेश चिंचकर, महिला पोलिस कर्मचारी राणी शिंदे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)