म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा मागोवा कसा घ्याल? (भाग-1)

प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःच्या ठरवलेल्या उद्दिष्टानुसार केलेली गुंतवणूक नेमकी कशा पद्धतीने वाढत आहे याचा पाठपुरावा किमान वर्षातून एकदा तरी घेणे आवश्‍यक आहे.

म्युच्युअल फंडाच्या सर्व योजना अत्यंत व्यावसायिक पद्धतीने व नियोजनपूर्वक व्यवस्थापनाने हाताळल्या जातात. प्रत्येक योजनेच्या ठरवलेल्या उद्दिष्टांनुसार गुंतवणूकदारांचे गुंतवलेले पैसे योग्य अशा गुंतवणुकीसाठी पूरक असणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. याचवेळी असणाऱ्या जोखमीचाही पूर्ण विचार केला जातो. हे करत असताना जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल याकडे सातत्याने लक्ष दिले जाते. म्युच्युअल फंड योजनांचे नियोजन करणारे फंडाचे मॅनेजर्स अनेक बाबी सखोलपणे तपासूनच गुंतवणुकीची कार्यपद्धती ज्याप्रमाणे ठरवलेली आहे त्यानुसारच गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असतात.

प्रत्येक गुंतवणूकदाराच्या गुंतवलेल्या पैशांचे कमीतकमी जोखमीसोबत जास्तीतजास्त परतावा देणाऱ्या संधींमध्ये गुंतवणूक करणे हे प्राथमिक उद्दिष्ट प्रत्येक फंड मॅनेजर निश्‍चित करत असतो.

म्युच्युअल फंड कंपनी (असेट मॅनेजमेंट कंपनी -एएमसी)
प्रामुख्याने प्रत्येक योजनेच्या कामकाजावर बारकाईने नजर ठेवून असते. कंपनीच्या ट्रस्टींची मुख्य जबाबदारी म्हणजे कंपनीच्या योजना योग्य पद्धतीनेच चालवल्या जातील व गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त चांगला परतावा कसा मिळेल, याकडे बारकाईने लक्ष देणे. अशा योजनांमध्ये नवीन गुंतवणूकदार सहभागी होत आहेत का याचा अभ्यास करून यासाठी लागणारी संपूर्ण विक्री यंत्रणा उभी करणे व योजनेचा विस्तार करणे. योजनेचे सर्व व्यवहार काटेकोरपणे सांभाळण्याची जबाबदारी रजिस्ट्रार व कस्टोडियन (गुंतवणुकीच्या संदर्भातील संपूर्ण माहितीचे संकलन व ती माहिती सुरक्षित ठेवणे) करत असतात. अतिशय कडक नियमावली व सखोल निगराणीत अशा योजना चालवल्या जातात. सिक्‍युरिटीज्‌ एक्‍सेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ची भली मोठी टीम यावर बारकाईने लक्ष ठेवून असते. अनेकविध अहवालांद्वारे म्युच्युअल फंडांच्या योजनांचे कामकाज कसे चालू आहे याची माहिती सातत्याने सेबी घेत असते.

असे असतानाही गुंतवणूकदाराने स्वतःच्या गुंतवणुकीचा मागोवा घेणे आवश्‍यक असते का? वर उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय काटेकोर नियमावलीनुसार गुंतवणुकीचे कामकाज होत असतानाही आपण आपल्या गुंतवणुकीचा पाठपुरावा करणे निश्‍चितच गरजेचे आहे. आपल्या ठरवलेल्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी म्युच्युअल फंडाची योजना ठरवलेल्या पद्धतीनेच कामकाज करत आहे का हे देखील पाहणे आवश्‍यक असते. ते कसे पाहावे याविषयीची माहिती

योजनेच्या कामगिरीचा आढावा घ्या
प्रत्येक म्युच्युअल फंडाची योजना त्याच्या ठरवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे एक बेंचमार्क ठरवून घेते. त्याच्यासोबत आपल्या योजनेची कामगिरीची तुलना केल्यास आपली योजना एका ठराविक विशिष्ट कालावधीत कशाप्रकारे कामकाज करत आहे व याकाळात कसा परतावा मिळाला आहे हे तपासता येते. हे करत असताना आपल्या योजनेच्या समान असणाऱ्या इतर अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांच्या योजनांची तुलना करणे व हे करत असताना त्यांचे कामकाज व आपल्या योजनेचे कामकाज याचा सारासार अंदाज घेता येतो. यासाठी आपल्या आर्थिक सल्लागारासोबत चर्चा करून नेमका अर्थ समजावून घेणे आवश्‍यक आहे. आपल्या योजनेची तुलना करताना योग्य अशा इतर योजनांसोबत व योग्य अशा बेंचमार्क इंडेक्‍ससोबत करणे आवश्‍यक आहे.

जर आपली गुंतवणूक इक्विटी म्युच्युअल फंडात केली असेल व आपली योजना छोट्या कालावधीत कमी परतावा अथवा वजा परतावा दाखवत असेल तर घाबरून जाऊ नये. कारण आपली इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही दीर्घकालावधीसाठी केलेली आहे हे विसरता कामा नये.

आपल्या योजनेच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट तपासा
बहुतांशी गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांसोबत योजनेच्या उद्दिष्टांची सांगड घालत नाहीत. अशावेळी अपेक्षित परतावा ठरलेल्या कालावधीत न मिळाल्यास उद्दिष्टपूर्ती होत नाही. बहुंताश वेळा म्युच्युअल फंडाच्या योजना वाढीसाठी (ग्रोथ) किंवा आकर्षक मूल्यांसाठी (व्हॅल्यू) अशा शैलीद्वारे योजनेचे व्यवस्थापन केले जाते. योजनेमध्ये सांगितलेल्या शैलीत बदल केला आहे का व तो बदल आपल्या परताव्यावर सकारात्मक झाला आहे का हे तपासणे गरजेचे आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा मागोवा कसा घ्याल? (भाग-2)

बऱ्याच वेळा फंड मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवतात व काळानुसार मोठ्या व छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. असे करणे योजनेच्या मूळ उद्दिष्टांपासून दूर जाण्यासारखे आहे. या सर्वांचा थेट परिणाम गुंतवणूकदाराच्या परताव्यावर होत असतो. अशा प्रकारचा बदल होत असताना योजनेच्या जोखमीतही मोठा बदलून घडवून आणत असतो. प्रत्येक योजनेची शैली व उद्दिष्ट योजनेच्या माहिती पत्रकात (सिड) दिलेली असते. याचा अभ्यास गुंतवणूकदाराने आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने करणे अपेक्षित असते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)