मौल्यवान वस्तूंचे “सुरक्षाकवच’ आणि नियम (भाग-१)

दसरा ते दिवाळी या उत्सवी काळात बहुतांश नागरिकांनी आपल्या आवडीनुसार, जीवनपद्धतीनुसार महागड्या वस्तुंची खरेदी केली असेल. यात घरगुती उपयोगाच्या वस्तूंबरोबरच टीव्ही-एलईडी, वॉशिंग मशिन, फ्रिज याशिवाय मोबाईल फोनचा देखील समावेश असेल. याशिवाय दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी आणि अन्य महागड्या वस्तूंची खरेदी देखील जोरात झाली असेल. कष्टाने कमावलेल्या पैशाने खरेदी केलेल्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काळजी घेतो, परंतु अनेकदा अपघातामुळे, दुर्घटनेमुळे महागड्या वस्तूंची हानी होण्याची शक्‍यता असते. अशा स्थितीत या महागड्या वस्तूंचा विमा उतरवून मोठ्या नुकसानीपासून वाचू शकतो. घरातील लाखमोलाच्या वस्तू कशा प्रकारे सुरक्षित ठेवता येईल, हे आपण पाहु या.

दुर्घटना आणि चोरीपासून संरक्षण
बहुतांश मंडळी घर खरेदी केल्यानंतर त्याचा विमा उतरवतात. आपत्कालिन स्थितीत घर सुरक्षित राहवे, हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र घराच्या विम्यामध्ये घरातील वस्तूंचा समावेश असतोच असे नाही आणि ही बाब फार कमी लोकांना ठाऊक असते. इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंना घराच्या विम्यात समाविष्ट केले जातेच असे नाही. अशा स्थितीत आपल्या घरातील टीव्ही. फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन आदी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि महागड्या सामानाचा विमा उतरवणे गरजेचे आहे. या विम्याला हाऊसहोल्ड्‌स पॉलिसी असे म्हणतात. त्यात कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेत, चोरी झाल्यास किंवा आपत्कालिन स्थितीत या सामानाची हानी झाल्यास त्याची भरपाई कंपनी करून देते.

मौल्यवान वस्तूंचे “सुरक्षाकवच’ आणि नियम (भाग-२)

मोबाईलसाठी वॉरंटी पुरेशी नाही
आजकाल बहुतांश बाजारात दहा हजारांपासून दीड लाखांपर्यंत मोबाईल फोन उपलब्ध आहे. नवनवीन फिचरच्या आवडीमुळे महागडे फोन खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. मात्र जवळपास सर्वच मोबाईलधारक हे मोबाईलसमवेत येणारी वॉरंटी ही सुरक्षेसाठी पुरेशी असल्याचे गृहित धरतात. परंतु अशा प्रकारची वॉरंटी ही पुरेशी नसते. आता विमा कंपन्या देखील मोबाईल फोनचा विमा उतरवतात. याप्रमाणे कंपन्या या मोबाईल फोनला विमा कवच प्रदान करतात. त्यात फोन हरवल्यास, चोरी गेल्यास, फुटल्यास यासारख्या स्थितीत सुरक्षा देण्याचे काम करतात. याप्रमाणे विमा कंपनीला गॅझेट खरेदीचे बिल पाच दिवसांच्या आत दाखल करावे लागते. विम्याची रक्‍कम ही मोबाईलची किंमत आणि हप्त्यावर अवलंबून असते. या विम्याचा कालावधी हा साधारण एक वर्षाचा असतो. मात्र काही विमा कंपन्या दोन वर्षाचा कालावधी देखील प्रदान करतात. मोबाईल फुटणे, चोरी होणे किंवा हिंसाचारादरम्यान फोनची हानी होणे, पाण्यात पडणे, आग लागणे, स्फोटामुळे नुकसान होणे, घाईगडबडीत विसरून जाणे, सायबर हल्ल्याने नुकसान होणे यासाठी देखील कंपनी विमाधारकाला भरपाई प्रदान करते.

– अपर्णा देवकर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)