मौनाची अर्थांतरे

आपल्याकडील बहुतेक चित्रपटात सगळीच लहानथोर मंडळी, अखंड बडबडत असतात. नायकनायिका खोटे, कृत्रिम बोलत असतात. खलनायक बटबटीत, लंब्याचौड्या बाता मारत असतात. आणि लहान मुलं तर काय, त्यांच्या निरागस चेहऱ्याला मुळीच शोभणार नाही अशी मोठी अर्थपूर्ण वाक्‍ये बोलत असतात. निःशब्दपणाचा, पॉझचा परिणामकारक उपयोग आपल्याकडील चित्रपटात फार कमी वेळा केला जातो.

मध्यंतरी “चेअर’ नावाची दहा मिनिटाची अप्रतिम फिल्म पाहिली. त्यात कुणीही एक शब्दही बोलत नाही. पहिल्या दृष्यात असे दिसते की, एक तरुण हातातलं पुस्तक वाचण्यात मग्न आहे. वाचतावाचता तो उठतो आणि पुस्तकातच नजर ठेवून शेजारच्या खुर्चीत बसायला जातो; तर खुर्ची किंचित मागे सरकते. तो आपल्याच नादात असतो. तो पुन्हा तीत बसायला जातो तर खुर्ची पुन्हा सरकते. याच्या ते लक्षात येतं. तो खुर्ची हातात धरून नीट बसायला जातो. पण खुर्ची त्याच्या हातातून निसटते. तो नवलानं खुर्चीकडे पाहतो. पुस्तक बाजूला ठेवतो आणि दोन्ही हातात खुर्ची धरून त्यावर बसण्याचा प्रयत्न करतो पण खुर्ची उलटी होते. पुष्कळ प्रयत्न करूनही त्याला खुर्चीवर बसणं अशक्‍य होतं. शेवटी तो नाद सोडतो आणि पुन्हा पहिल्यासारखा खाली जमिनीवर बसून पुस्तक वाचायला सुरुवात करतो. तर खुर्ची आपली हळूच त्याच्यापाशी येते. तो दुर्लक्ष करतो. तर ती अगदी सारखी त्याच्याभोवती घुटमळायलाच लागते. म्हणून हा उठतो आणि तिच्यावर बसायला जातो तर तिचा पुन्हा असहकार. ती त्याच्याजवळ येते खरी, पण हा बसायला लागला की लांब जाते.

शेवटी त्याला काय वाटतं कोण जाणे, तो पुढं येतो, खुर्चीला उचलून घेतो. थोपटतो, जवळ घेतो आणि खाली ठेवतो. आणि पुन्हा पहिल्यासारखा खालीच बसून वाचायला लागतो. ती पुन्हा त्याच्याजवळ घुटमळायला लागते. मग तो तिला उचलतो, हातात घेऊन प्रेमानं लहान मुलाला जोजवावं, तसं तिला आंदोळतो. मग बसल्याबसल्या तिला आपल्या मांडीवर घेतो… मांडीवर तिला बसवतो. असं सगळं झाल्यावर खुर्चीला शेजारी ठेवून देतो आणि वाचायला लागतो. मग ती काही जवळ येत नाही. हा शांतपणे वाचत राहतो. थोड्या वेळानं वाचतावाचता उठतो आणि नकळत खुर्चीत बसतो… चक्क बसतो…बसू शकतो. खुर्ची त्याला बसू देते आणि इथंच चित्रपट संपतो.

काय अर्थ या चित्रपटाचा? तुम्ही काढाल तो. कदाचित खुर्ची असं म्हणत असेल, खुर्ची असले म्हणून काय झालं? कधी मला प्रेमानं जवळ घेतोस? माझा तुला इतका उपयोग होतो; तू कधी माझ्याकडे नीटपणे पाहिलंयस का? पाहा तरी. मला स्पर्श कर. मला गोंजार. आणि तूच का नेहमी मला वापरायचं? मी का नाही? तू माझ्या अंगावर बसतोस, मलाही तुझ्या मांडीवर घे की! आपण भूमिकांची अदलाबदल केली तर? कधीतरी माझ्या भूमिकेत ये… मला कधीतरी तुझ्या भूमिकेत शिरून बघू दे. आणि हो, मला तू हवा आहेस. माझं अस्तित्व तू कधी विसरू नकोस. माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं मला चालणार नाही…आपण दोघेही एकमेकांना सहकार्य करू. एकमेकांना पूरक होऊ. असं आणखी कितीतरी या चित्रपटातून ती खुर्ची सुचवत असेल का? सगळं मूकपणे… आणि म्हणूनच त्या मौनाला तुम्ही द्याल तितके अर्थ!

– माधुरी तळवलकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)