मोहाचा संहारक तृतीयावतार महोदर

– प्रा. दीपक कांबळे

श्री गणेश अवतार : श्री महोदर गणेश

भगवान श्री गणेश यांचा तिसरा अवतार महोदर हा आहे. महोदर हे वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप आहे. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक म्हणजे महोदर. याने मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे. महोदरासंबंधी एक श्‍लोक प्रसिद्ध आहे.

महोदर इति ख्यातो ज्ञानब्रम्हाप्रकाशक:।
मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनग स्मृत:।।

महोदर नावाचा महान अवतार हा ज्ञान ब्रह्माचा प्रकाशक आहे. त्याला मोहासुराचा विनाशक आणि मूषकवाहन सांगितले आहे.

श्री महोदर : अवतार कथा 1
प्राचीन काळात तारक नावाचा निर्दयी असुर होता. तो ब्रह्माच्या वरदानाने त्रैलोक्‍याचा स्वामी झाला होता. त्याच्या शासन काळात देवता आणि मुनी दु:खी होते. ते जंगलात राहून कष्ट सहन करत आपले जीवन व्यतीत करत होते. देवता आणि ऋषींनी बरेच दिवस शिवाचे ध्यान केले. भगवान समाधिस्थ असल्यामुळे त्यांनी माता पार्वतीची प्रार्थना केली.

पार्वतीने सुंदर भिल्लीणीच्या रूपात शिवाच्या आश्रमात प्रवेश केला. सुगंधित फुलांची निवड करताना शिवाला मोह पडेल याचीही ती काळजी घेत होती. तिच्या येण्याने शिवाची समाधी भंग पावली. त्या लावण्यवतीला लक्षपूर्वक पाहताच भिल्लीण अदृश्‍य झाली. तेथे देखणा असा कामदेव निर्माण झाला. पार्वतीची ही लीला असे समजून भगवान शंकर संतापले. त्यांनी कामदेवाला शाप दिला. या शापातून मुक्‍त होण्यासाठी कामदेवाने महोदराची उपासना केली.

महोदर प्रकट झाले. कामदेव त्यांची स्तुती करू लागले. महोदर प्रसन्न होऊन म्हणाले की, “मी शिवाच्या शापापासून मुक्‍त करू शकत नाही, परंतु तुला राहण्यासाठी अन्य देह देत आहे

यौवन स्त्रीच पुष्पाणि सुवासानी महामते।
गानं मधुरसश्‌चैव मृदुलाण्डजशब्दक:।।
उदयानानि वसंतश्‌च सुवासाश्‌चन्दनादय:। 
संगो विषयसक्‍तानां नराणां गृहादर्शनम:।।
वायुर्मुदु: सुवासश्‌च वस्त्राण्यपि नवानि वै:।
भूषणादिकमेवं ते देहा नाना कृता मया।।
तैर्युत: शंकरादीश्‌च जेष्यसि त्वं पुरा यथा।
मनोभू: स्मृतिभूरेवं त्वन्नामानि भवन्तु वै।।

“महामते यौवन, स्त्री आणि पुष्प तुझा सुंदर वास आहे. गान, मकरंद रस, पक्ष्यांचा मधुर आवाज, उद्यान, वसंत आणि चंदनादी तुझे सुंदर आवास आहे. मनुष्याची विषयासक्त संगत, मंद वायू, नवीन वस्त्र आणि आभूषणे इत्यादी ही सर्व शरीरे मी तू यासाठी निर्माण केली आहेत. या शरीराने युक्‍त तू पहिल्यासारखे शंकरादी देवतांचे मन जिंकू शकतो. अशा प्रकारे तुझे “मनोभू’ आणि “स्मृतिभू’ आदी नावे असतील. श्रीकृष्णाचा अवतार होईपर्यंत तू त्यांचा पुत्र प्रद्युम्न असशील.

श्री महोदर : अवतार कथा 2
शिवपुत्र कार्तिकेयाने “वक्रतुंण्डाय हुम्‌’ हा सहा अक्षरी मंत्रजपाने गणेशाला प्रसन्न केले. गणेशाने कार्तिकेयाला वर दिला की, तू तारकासुराचा वध करशील. राक्षसांचे गुरू शुक्राचार्य यांनी मोहासुराला दीक्षा दिली आणि त्यांच्या आदेशानुसार मोहासुराने सूर्याला प्रसन्न करण्यासाठी निरंकार राहून अनेक वर्ष कठोर तपस्या केली. त्या तपामुळे संतुष्ट होऊन सूर्यदेव प्रकट झाले. सूर्यदेवाने त्याला आरोग्य आणि सर्वत्र विजयी होण्याचा वर दिला.

वर मिळाल्यानंतर मोहासुर गुरू शुक्राचार्यांकडे आला. त्यांनी त्याला दैत्यराजाच्या पदावर बसविले. त्याने त्रैलोक्‍यावर अधिकार गाजवायला सुरवात केली. त्याला घाबरून देवता आणि ऋषीमुनी जंगलात लपून बसले. मोहासूर आपली पत्नी मदिराबरोबर राहू लागला. नंतर भगवान सूर्याने गणेशाला प्रसन्न करण्यासाठी देवता, ऋषीमुनींना प्रेरित केले. कष्ट सहन करत देवता आणि मुनींनी मूषकवाहनांची उपासना करण्यास सुरवात केली.

हे पाहून महोदर प्रसन्न झाले. त्यांनी देवता आणि मुनींना सांगितले की, “तुम्ही निश्‍चिंत रहा, मी मोहासुराचा वध करेन.’ मूषकवाहक महोदर मोहासुराशी युद्ध करण्यासाठी प्रस्थापित झाला असल्याची बातमी देवीश्रीने मोहासुराला दिली. महोदराचे सत्य स्वरूप त्याला समजून सांगितले. त्यांना शरण जाण्यासाठी प्रेरित केले. दैत्य गुरू शुक्राचार्यांनीदेखील महोदराला शरण जाण्याचा सल्ला दिला.

तेवढ्यात विष्णू महोदराचा संदेश घेऊन उपस्थित झाले. त्यांनीही मोहासुराला समजावून सांगितले. मोहासुराने महोदराला आपण शरण आल्याचे सांगितले. त्यानंतर महोदराने मोहासुराच्या नगरीत प्रवेश केल्यानंतर त्याने त्यांचे स्वागत केले. त्याने महोदराच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करण्याचे आश्‍वासन दिले. तेव्हा देवता आणि ऋषीमुनी प्रभु महोदराचे स्तवन आणि जयजयकार करू लागले.

ब) अष्टविनायक दर्शन
प्रथम अष्टविनायक : मोरगावचा मोरेश्‍वर
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्‍वर. या गणपतीस श्री मयुरेश्‍वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्‍वर गणेशाचे हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी “सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते. जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्‍वराच्या डोळ्यांत व नाभीत हिरे बसवलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्‍यात मोरगाव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे 70 कि. मी. अंतरावर आहे, तर बारामतीपासून 35 कि. मी. अंतरावर आहे.

क) मानाचे गणपती :
दुसरा मानाचा गणपती : श्री तांबडी जोगेश्‍वरी गणपती, पुणे
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती असलेल्या श्री तांबडी जोगेश्‍वरी मंडळाची स्थापना 1893 मध्ये झाली. कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत, तर तांबडी जोगेश्‍वरी ही ग्रामदेवता आहे. लोकमान्य टिळकांनी म्हणूनच विसर्जन मिरवणुकीत कसब्याच्या गणपतीस मानाचे पहिले व तांबडी जोगेश्‍वरी मंडळाच्या गणपतीला मानाचे दुसरे स्थान दिले. लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्यापासून विसर्जन मिरवणुकीतील हे मानाचे स्थान कायम आहे. मंडळाच्या स्थापनेपासून गुळुंजकर घराण्यातील मूर्तिकारच ही मूर्ती बनवतात. सध्या या घराण्यातील चौथी पिढी मूर्ती तयार करण्याचे काम करत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात गायन, नाटक, नकला असे कार्यक्रम सादर होत. त्यातून स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रबोधन केले जात असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संगीताचे जाहीर कार्यक्रम होऊ लागले. आजही पारंपरिकतेला प्राधान्य देऊन मंडळातर्फे उत्सवातील दहा दिवस फक्त धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडळाच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजे 1993पर्यंत गणेशाचे आगमन आणि विसर्जन सरदार नातूंकडील पेशवेकालीन पालखीतून होत असे. शताब्दी वर्षात मंडळाने चांदीची पालखी तयार केली. 2007मध्ये श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी चांदीचा देव्हारा बनवण्यात आला. मिरवणुकीसाठी साउंड सिस्टीमचा अजिबात वापर केला जात नाही. विसर्जन मिरवणुकीत वेळेबाबतच्या शिस्तीचेही पालन केले जाते. स्वयंसेवकांच्या मदतीने मिरवणुकीतील दोन पथकांमध्ये अंतर राहणार नाही याची काळजी घेण्यात येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)