मोहसिन शेख खुन प्रकरण : ऍड. रोहिणी सॅलियन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीची मागणी

 

पुणे, दि. 19 (प्रतिनिधी) – हडपसर भागात उसळलेला दंगलीत अभियंता मोहसिन शेख याच्या खुन झाल्याप्रकरणात ऍड. रोहिनी सॅलियन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी मोहसिन याच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. या मागणीचा अर्ज विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांच्या न्यायालयात सोमवारी सादर करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जुलै रोजी होणार आहे.
फेसबुकवर शिवाजी महाराज यांची बदनामी झाल्याप्रकरणी 2 जून 2014 रोजी हडपसर भागात दंगल उसळली होती. त्यामध्ये अभियंता मोहसिन शेख याचा खुन झाला होता. या प्रकरणी हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई (वय 34, रा. हिंदुगड, मूळशी) यांच्यासह अन्य 20 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी काही
आरोपींना जामिनही मिळाला आहे. देसाई यांना जामिन मिळावा, यासाठी बचाव पक्षातर्फे ऍड. मिलिंद पवार, ऍड. भालचंद्र पवार यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली होती. मात्र, निकम यांनी केलेल्या अर्जानुसार राज्य सरकारने निकम यांची नियुक्ती रद्द केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मोहसिन याचे वडिल मोहम्मद सादीक शेख यांनी मुख्यमंत्री आणि न्यायालयात हा अर्ज केला आहे.
चौकट
विधी, न्याय विभागाला नोटीस बजावण्याची बचाव पक्षाची मागणी
हा खटला मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. धनंजय देसाई यांनी वैद्यकीय कारणासाठी जामिन मिळावा, असा अर्ज करून अनेक दिवस उलटले. मात्र, या खटल्यात सरकारी वकील नसल्याने यावर सुनावणी होवू शकली नाही. हा आरोपीवर होणारा अन्याय आहे. या पार्श्‍वभूमीवर त्वरित सरकारी वकील नेमावा, यासाठी राज्य सरकारच्या विधी, न्याय विभागाला, प्रमुख जिल्हा सरकारी वकील आणि तपासी अधिकाऱ्याला नोटीस बजावण्याची मागणी बचाव पक्षातर्फे ऍड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात अर्ज करून केली आहे. या अर्जानंतर न्यायालयाने प्रमुख जिल्हा सरकारी वकिलांना नोटीस बजावली असल्याची माहितीही ऍड. पवार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)