‘मोसूल’ प्रकरणाची मीमांसा आणि बोध (भाग2)

डॉ. शैलेंद्र देवळाणकर
परराष्ट्र धोरण विश्‍लेषक

मोसूलमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांची आयसिस या दहशतवादी संघटनेकडून हत्या झाल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतीच दिली. ही घटना अत्यंत दुःखद असून त्यावरून राजकारण करत सरकारवर दोषारोप करताना वास्तविकता समजून घेतली पाहिजे. मुळात हे कर्मचारी स्वेच्छेने तेथे गेले होते. तसेच अपहरण झाल्याचे समजल्यानंतर भारत सरकारकडून त्यांची सुटका करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करण्यात आले. आयसिसने मागील काळात भारतीय नर्सेसची, तसेच ख्रिश्‍चन धर्मगुरूंची सुटका केल्यामुळे शासन आशावादी होते. तसेच खुद्द इराक सरकारलाच त्यांच्याविषयी माहिती नसल्यामुळे भारताच्या सुटकेच्या प्रयत्नांना मर्यादा होत्या. आता भविष्यात आखातातील भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी संस्थात्मक संरचना उभी करणे हाच या प्रकरणाचा बोध आहे.

जगातल्या इतर देशांसाठी आखाती देश हा आकर्षणाचा विषय झाला. ही संधी भारत सरकारने साधली आणि 1983 मध्ये निर्वासित कायदा तयार केला. त्यानंतर अनेक भारतीयांचे स्थलांतर व्हायला सुरुवात झाली. आखाती देशांतील पाच देशांमध्ये लाखांच्या संख्येने भारतीय लोक स्थलांतरित होऊ लागले आणि ते तिथेच स्थायिक होऊ लागले. आज सौदी अरेबिया, कतार, बहारिन, कुवेत, ओमान, संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये जवळपास 80 लाख भारतीय आहेत. जगभरातील निर्वासितांचा विचार केला तर आखाती देशांमधील भारतीयांचे प्रमाण तब्बल 60 टक्के आहे. 1983 चा कायदा प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी करण्यात आला. एक म्हणजे बेरोजगारी आणि दुसरे म्हणजे या कामगारांकडून भारतात पाठवल्या जाणाऱ्या पैशांमधून मिळणारे परकीय चलन. हा कायदा केल्यानंतर 2001 मध्ये सर्वसमावेशक असा इमिग्रेशन ऍक्‍ट बनवला गेला. त्याचबरोबर भारत सरकारने मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसिझ अफेअर असे एक स्वतंत्र खाते त्यासाठी निर्माण केले. त्याअंतर्गत आपण पाच देशांशी करार केले. त्यानुसार आखाती देशांमधील तेल उद्योग आणि बांधकाम उद्योग यांमध्ये कामगार पाठवायला सुरुवात केली. मध्यंतरी, कतारमध्ये फुटबॉलचा विश्‍वचषक झाला. त्यावेळी भारताने कतारशी केलेल्या करारांतर्गत पाच लाख लोक भारतातून या स्पर्धेच्या तयारीसाठी पाठवले होते.

संबंधित वृत्त – ‘मोसूल’ प्रकरणाची मीमांसा आणि बोध (भाग1)

आजघडीला आखाती प्रदेशात 30 लाख कामगार राहतात. त्यांच्याकडून भारताला सुमारे 70 अब्ज डॉलर्सचे परकीय चलन दरवर्षी मिळते. भारतातून या देशांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडील बेरोजगारी. आपल्याकडे 2001 ते 2015 या काळात आठ कोटी लोक ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतरीत झाले. त्यातील 80 टक्के लोक बांधकाम क्षेत्रात गेले. आखाती देशांमध्ये भारताच्या तुलनेत बांधकाम क्षेत्रात मोठी बूम आहे. त्यामुळे हे कामगार फार मोठया प्रमाणात करारावर सह्या करून आखातात जाऊ लागले. आपल्या 80 लाख भारतीय कामगारांपैकी 30 लाख कामगार हे बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे गेले असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांना तिथे पाठवणाऱ्या खासगी कंपन्यांकडून कामगारांची फसवणूक केली जाते. या कामगारांना तिथे कोणत्या अवस्थेत राहावे लागेल, किती पगार मिळेल हे सांगितले जात नाही. परिणामी, अनेकदा भारत सोडून तिथे गेल्यावर भीषण वास्तवाला सामोरे जावे लागते. अनेक कंपन्यांकडून ही फसवणूक आजही होत आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे गेलेल्या अशा कामगारांना मदत करणे भारतीय दूतावासाला शक्‍य होत नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारने फेब्रुवारी 2015 मध्ये “मदत’ नावाचे पोर्टल काढले. आखाती देशात काम करणाऱ्या निर्वासितांनी आपल्या समस्या, अडचणी या पोर्टलवर टाकाव्यात असे आवाहन करण्यात आले. याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये पंतप्रधानांनी आखाती देशांना भेटी दिल्या, त्या भेटींमध्येही त्यांनी निर्वासितांच्या समस्या हा प्रमुख मुद्दा मांडला होता. मात्र या कामगारांच्या सुविधा, संरक्षण यांच्यासाठी अधिक ठोस पावले उचलायलाच हवीत. त्याचप्रमाणे भारताने आता प्राधान्याने “लूक वेस्ट पॉलिसी’ तयार केली पाहिजे. या धोरणामध्ये तिथल्या कामगारांच्या सुरक्षेसाठी अत्यंत ठोस कायदे बनवले पाहिजेत. त्यामुळे खासगी कंपन्या, दलाल यांच्याकडून या कामगारांची होणारी फसवणूक टळू शकेल. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या कामगारांना देशात परत आणता येईल असे कायदे बनवले पाहिजेत. प्रसंगी त्या देशांवर दबाव टाकून, आपले राजनैतिक कसब पणाला लावून, मुत्सद्देगिरी दाखवून असे कायदे करुन घेतले पाहिजेत. आताची ही घटना ही भारतासाठी असा कायदा निर्माण करुन घेण्यासाठी एक प्रकारे महत्त्वाची संधी आहे, असे मानून आखातातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करुन घेतला पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)