मोसंबीचा आंबेबहार हंगाम सुरू

मार्केट यार्डात आवक : तीन डझनास मिळतोय 100 ते 200 रुपये भाव

पुणे- आंबेबहार मोसंबीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून या मोसंबीची मार्केट यार्डातील फळ विभागात आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात दाखल होणाऱ्या मोसंबीची चव थोडी आंबट आहे. येत्या पंधरा दिवसांत गोडी वाढणार असल्याचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी सांगितले.
गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील फळ विभागात रविवारी 30 टन मोसंबीची आवक झाली. औरंगाबाद, अहमदनगर, जालना जिल्ह्यातून ही आवक होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात आवक वेळेत सुरु झाली आहे. ही आवक मार्च अखेरपर्यंत सुरु राहिल. यंदा हवामान पोषण असल्याने मोसंबीचे उत्पादन वाढणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे पिकांबाबत शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बाजारात आलेल्या मोसंबीला घाऊक बाजारात तीन डझनास 100 ते 200 रुपये, तर चार डझनास 40 ते 80 रुपये भाव मिळत असल्याचे ढमढेरे यांनी सांगितले. बाजारातील परिस्थिती पाहता पुढील दोन महिने मोसंबीचे भाव स्थिरच राहतील, असा अंदाज आहे. सध्या मद्रास मोसंबीचाही हंगाम सुरु आहे. त्यामुळे या मोसंबीला दिल्ली, बेंगलोर, गोवा, हुबळी, धारवाड आदी ठिकाणांवरुन मद्रास मोसंबीला मागणी आहे. परिणामी, परराज्यातून आंबेबहार मोसंबीला कमी मागणी आहे. काही दिवसांनी मद्रास मोसंबीचा हंगाम संपेल. त्यानंतर आंबेबहार मोसंबीला बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढेल, असा अंदाज ढमढेरे यांनी व्यक्त केला. मोसंबीला ज्युसविक्रेते, स्टॉलधारकांकडून तसेच काही प्रमाणात घरगुती ग्राहकांकडून खरेदी केली जात आहे. मोसंबीचा रस सेवन करणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जात असल्यामुळे ग्राहकांकडून मोसंबी खरेदीस पसंती दिली जाते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)