मोशी येथील पादचारी पूल बनला मद्यपींचा अड्डा

  • चालणे झाले अवघड ः पुलावर मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या

मोशी, (वार्ताहर)- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशी येथे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलंडता यावा, यासाठी लाखो रुपये खर्चून पादचारी पूल बांधण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी येथील देहू फाटा जवळचा हा पूल आता मद्यपींसाठी हक्‍काची जागा बनला आहे. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पादचारी पुलास टवाळखोर मद्यपींनी आपला अड्डा बनवले आहे.

या पुलावर नेहमी मोठ्या प्रमाणात दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळतात. भर चौकालगत पुलावरच आता ओल्या पार्ट्या होऊ लागल्या असल्याने स्थानिक नागरीक संताप व्यक्‍त करत आहेत.

मोशीतील मुख्य चौकात पोलीस चौकी असून या चौकापासून हाकेच्या अंतरावर सर्वसामान्य नागरिकांसाठी दोन पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. या पुलाचा वापर बोराटे आळी, गावठाण तसेच नागेश्वरनगर येथील नागरीक व नागेश्वर विद्यालयात जाणारे विद्यार्थी करतात. महामार्गावर 24 तास वाहने धावत असल्याने रस्ता ओलंडण्यासाठी हा सुरक्षित मार्ग मानला जातो. तसेच या पुलावर रात्रीच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरीक, लहान मुले चालण्यासाठी येत असायचे. परंतु सध्या मात्र या पुलावरून दिवसा देखील चालणे मुश्‍किल झाले आहे. पुलावर दारुच्या बाटल्या, प्लास्टिकचे रिकामे ग्लास, कचरा आढळून येतो. तसेच फोडलेल्या बाटल्यांच्या काचा देखील सर्वत्र पसरलेल्या असतात.

या पुलाचा वापर सध्या मद्यपी लोंकाकडून करण्यात येत असून रात्रीच्या वेळी बिनदिक्‍कतपणे या पुलावर ओल्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. त्यामुळे या भागातून महिला वर्गाला ये जा करणे धोक्‍याचे ठरत असल्याचे स्थानिक महिलांचे म्हणणे आहे. या पादचारी पुलापासून मोशी पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर आहे. संध्याकाळी झाली की, या पुलावर मद्यपींची मैफिल रंगू लागते. सर्व काही माहीत असून आणि पाहूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

वाढली अपघाताची भीती
पुलावर पडलेल्या दारुच्या बाटल्या, मद्यपींनी नशेत केलेली घाण आणि मद्यपींची भीती पाहता सायंकाळनंतर महिला, ज्येष्ठ नागरीक आणि मुलांनी पुलाचा वापर टाळण्यास सुरुवात केली आहे. या महामार्गावरुन 24 तास वाहने भरधाव वेगाने धावत असतात. नागरिकांनी जर पादचारी पुलाचा वापर टाळला तर अपघातांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्‍त केली जात आहे. सर्वसामान्य नागरीक, महिला वर्गाला होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पोलिसांनी योग्य कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. भविष्यात एखादा अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न ही स्थानिक नागरीक उपस्थित करत आहेत .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)