“महावितरण’ची डोळेझाक : राहुल कोल्हटकर यांचा आरोप

पिंपरी – मोशी प्राधिकरण पेठ क्रमांक 6 येथील एका व्यावसायिक इमारतीला चुकीच्या पद्धतीने आणि बेजबाबदारपणे वीजजोड देण्यात आले आहे. ही गंभीर बाब असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. तरीही महावितरण कार्यालयाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांना व ठेकेदारांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. कार्यालयाकडून त्यांना पाठिशी घातले जात असल्याचा आरोप विद्युत वितरण समिती सदस्य राहुल कोल्हटकर यांनी केला आहे.

या प्रकरणी 21 फेब्रुवारी रोजी प्रधान सचिव उद्योग, उर्जा, कामगार विभागाकडुन महावितरणाच्या व्यवस्थापकीय संचालकांना संबधित तक्रारदार कोल्हटकर यांना कारवाईची माहिती देण्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यानंतर अधीक्षक अभियंता (पुणे) यांच्याकडून कार्यकारी अभियंता व अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता (आकुर्डी) यांना महावितरण कंपनीच्या नियमानुसार त्वरित कार्यवाही करून सविस्तर अहवाल देण्याबाबत 28 मार्च व 16 एप्रिल असे दोन वेळा पत्र देण्यात आले. त्यानंतर वारंवार विचारणा व पाठपुरावा करून देखील कुठलीही कार्यवाही झाली नाही. कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली नाही.

…तर न्यायालयात जाणार!
संबंधित इमारतीला बेकायदेशीर वीज पुरवठा चालू असून तेथे अनेक व्यावसायिक दुकाने व ऑफिस चालू झाले आहेत. शेजारीच आरटीओचे नवीन कार्यालय चालू झाले असून नागरिकांचा वावर वाढला आहे. बेकायदेशीर वीज पुरवठ्यामुळे अपघाताची शक्‍यता आहे. लोकांचा जीव धोक्‍यात असताना व चुकीचे काम केले असतांना सुद्धा विद्युत निरीक्षक कार्यालय, महावितरण यांच्याकडून महावितरणचे अधिकारी व ठेकेदार, बिल्डर यांनी संगनमताने भष्टचार करून चुकीची कामे केली असून वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठिशी घालत आहेत. या प्रकरणी लवकरच आंदोलन करणार असून न्यायालयात याचिका देखील दाखल करणार असल्याचे राहुल कोल्हटकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)