मोशी प्राधिकरणातील खेळाडूंची “वाऱ्यावर वरात’

पिंपरी – मोशी प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 4 व 10 मधील क्रीडांगणाचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेने हे क्रीडांगण आरोग्य विभागाला वापरायला दिल्याने खेळाडूंची “वाऱ्यावर वरात’ सुरु आहे. आरोग्य विभागाचे क्रीडांगणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच क्रीडांगणाचा बाहेरच्या व्यक्तींकडून गैरवापर होत आहे. याबाबत स्थानिक रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

तीन वर्षापूर्वी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने पेठ क्रमांक 4 मध्ये टेनिस कोर्ट व पेठ क्रमांक 10 मध्ये हॉकीचे क्रीडांगण उभारून ते महापालिकेकडे हस्तांतरीत केले. सर्व प्रक्रिया पुर्ण होवूनही महापालिकेने या क्रीडांगणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले. तसेच खेळाडूंना खेळण्यासाठी क्रीडांगण खुले न केल्याने ते विनावापर पडून आहे. यामुळे आजुबाजूच्या परिसरातील मद्यपींनी येथे ठिय्या मांडला आहे. त्यामुळे परिसरात दारूंच्या बाटल्यांचा खच जमा झाला आहे. तसेच परिसरात वेळेवर साफसफाई झाली नसल्याने क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पेठ क्रमांक 4 च्या क्रीडांगणावर तीन महिन्यांपूर्वी सुरक्षा रक्षक नेमला असून वेळेत साफसफाई होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे परिसरात झाडे-झुडपे वाढली आहेत. तसेच टेनिस कोर्टच्या इमारतीमधील एका खोलीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून त्यातील पंख्याची देखील तोडफोड करण्यात आली आहे. त्या खोलीमध्ये अस्वच्छता असल्यामुळे परिसरात दूर्गंधी पसरत आहे. तेथे सुरक्षा रक्षक असून परिसरात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच सौर दिव्यांची तोडफोड करण्यात आली आहे. परिसरातील काही नागरिकांनी वारंवार पालिकेच्या क्रीडा विभागाकडे तक्रारी केल्यावर क्रीडांगण परिसरातील एका शाळेला वापरायला दिले. मात्र, क्रीडांगणाची परिस्थिती “जैसे थे’ आहे. त्यातही क्रीडांगणाची इमारत आरोग्य कार्यालयाला वापरायला दिल्याने समस्या सुटण्याऐवजी त्यात भर पडली आहे.

पेठ क्रमांक 10 च्या हॉकी मैदानाची इमारत सुद्धा आरोग्य कार्यालयाला वापरायला दिली आहे. मात्र, त्यांचे देखील या क्रीडांगणाकडे लक्ष नसल्याने परिसरात सगळीकडे कचऱ्याचे ढीग जमा झाले असून दारूच्या बाटल्यांचा खच सर्वत्र पहायला मिळत आहे. सुरक्षा रक्षक नेमला नसल्याने भुरट्‌या चोरांना मोकळे रान मिळाले आहे. तसेच क्रीडांगणाच्या दरवाजाला साधे कुलूप नसल्याने परिसरात कोणीही येऊन त्यांची वाहने उभी करून जात आहेत. हॉकीच्या मैदानावर झाडं-झुडपे वाढली आहेत. यामुळे परिसरातील मुले देखील क्रीडांगणाकडे फिरकत नाहीत.

रक्षकांअभावी सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
पेठ क्रमांक 10 येथील हॉकीचे क्रीडांगण आरोग्य कार्यालयाला वापरायला दिले असून त्यांनी देखील पालिकेच्या उर्जा बचत योजनेची पायमल्ली केली असल्याचे दिसून आले. इमारतीमध्ये पाहणीसाठी गेल्यावर तेथील पंखा आणि विजेचे दिवे चालूच असल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे याठिकाणी अद्याप सुरक्षा रक्षक नेण्यात आला नाही. त्यामुळे येथील सुरक्षा ऐरणीवर आहे. खेळाडूंच्या सोईसाठी कोट्यावधी रुपये खर्चून प्राधिकरणाने ही क्रीडांगणे उभारली. मात्र, महापालिकेकडे त्यांचे हस्तांतरण झाल्यानंतर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे क्रीडांगणाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. एकीकडे खेळाडूंना मैदाने मिळत नसताना दुसरीकडे कोट्यावधीची मालमत्ता धूळखात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)