‘मोरगिरी’च्या अपरिचित वाटेवर…

खरंतरं एखाद्या रविवारी बाहेर कुठ जायचे आणि काय पहायचे? असा प्रश्न एखाद्या दुर्गभटक्याला कधी पडतच नसतो. कारण सह्याद्रीच्या कुशीत अनेक ज्ञात-अज्ञात ठिकाणे अक्षरशः ठाण मांडून बसलीत. या अशाच आडवाटेवर आणि इतिहासातही उल्लेख नसलेला एक किल्ला उभा आहे. मोरगिरी त्याचं नाव! 

तर हा मोरगिरी उभा आहे, पुणे जिल्ह्याच्या आणि रायगड जिल्ह्याच्या सीमारेषेजवळ. मोरगिरीच स्थान हे तुंग-तिकोना- लोहगड-विसापूर-कोरीगड यांच्या परिघात आहे. त्यामुळे या मोरगिरीवर भूगोलाची किती उधळण असेल यांची कल्पना केलेलीच बरी. कातकरी वस्तीवरून आपण थेट मोरगिरीकडे निघायचे. या मार्गावर बऱ्याच ठिकाणी एका ट्रेकिंग ग्रुपने बाणांच्या खुणा केलेल्या दिसतात, त्यामुळे वर जाण्यासाठी यांचा फार उपयोग होतो. वस्तीपासून आपण चालायला सुरुवात केली तर खड्या चढाईनंतर अर्ध्या तासात आपण एका सपाटीवर येतो. या सपाटीवरून पुन्हा पाउण तासाची चाल आहे. आता मात्र मोरगिरी आपल्यासमोर असतो. परंतु आपणाला याला वळसा मारून जायचे असते, उजव्या बाजूला खोलवर दरी आपल्या सोबत असते. नंतर पुन्हा हि वाट डावीकडे वळते. आता सपाट चालीनंतर पुन्हा आपल्याला मुख्य किल्ल्याची चढण लागते. हा टप्पा अत्यंत कठीण असून पावसाळ्यात येथे येणे केवळ अशक्यच! ही वाट अत्यंत घसाऱ्याची असून अगदी जपून आपल्याला चढाई करावी लागते. ही अत्यंत कठीण चढाई पार करून आपण एका पाण्याच्या टाक्यापाशी आणि छोट्याश्या गुहा मंदिरापाशी येतो.

-Ads-

येथे गुहेत हे जाखमातेचे मंदिर आहे. या टप्प्यापासून पुढे लोखंडी शिडी लावली आहे. ही पार केली की, आपल्याला कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांनी आपण माथ्या वर हजर होतो. गडाचा माथा अत्यंत छोटा असून यावर पाण्याच्या दोन टाक्याही दिसतात. बाकी तटबंदीचे, बुरुजाचे, दरवाजेचे अवशेष मात्र दिसून येत नाही. पण माथ्यावरून दिसणारा भूगोल मात्र डोळ्यांचे शब्दशः पारणे फेडतो. जिकडे पहावे तिकडे, चहूबाजूंनी सह्याद्रीच अक्षरशः रौद्र तांडव आपल्याला अनुभवायला मिळतो. विशेषतः दक्षिणेकडे म्हणजेच मोरवे गावाच्या दिशेने सळसळत गेलेली डोंगराची रांग नजरेत भरते. रुंद पठार असलेली ही रांग एखादी नागमोडी सळसळत गेलेली माचीच वाटून जाते. पूर्वेकडे दिसणा-या तुंग- तिकोना या जोडगोळीसाठी काही वेळ राखुनच ठेवायला हवा. या साऱ्या दृश्यांना डोळ्यात सामावण्यासाठीची आपली धडपड मात्र केविलवाणी होते. परतीच्या प्रवासात तीव्र उतार समोर असतो. शरीराचा तोल सांभाळायचा असतो. पायांनाही काबुत ठेवायचे असते. तरीही मनात मात्र पाहिलेल्या ठिकाणांचा फ्लॅशबॅक चालूच असतो. मोरगिरी हे ठिकाण केवळ कसलेल्या डोंगर यात्रींसाठीच आहे. येथे चुकीच्या वागणुकीला क्षमा नाही, तसेच पावसाळा सोडून इतर ऋतूत येथे येणे कधीही चांगलेच.

– ओंकार वर्तले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)