मोबाईल टॉवर्स हलवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!

SAMSUNG CAMERA PICTURES

निगडी – शहरातील इमारतींवर बसवण्यात आलेल्या मोबाईल टॉवर्समुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. कोणत्याही परिस्थितीत हे मोबाईल टॉवर हलवू, असा निर्धार जागरुक नागरीक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुटुंब मेळाव्यात व्यक्‍त करण्यात आला.

जागरुक नागरीक संघटनेच्या वतीने आकुर्डी येथे कुटुंब मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. गुणवंत चिखलीकर होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मिलिंद बेंबळकर, जागरूक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी, उपाध्यक्ष मनोहर पद्मन, ग्राहक पंचायतीचे रमेश सरदेसाई हे उपस्थित होते.
मेळाव्याच्या प्रास्ताविक करताना अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी म्हणाले की, गेले चार महिने संघटनेने मोबाईल टॉवर्सचा प्रश्न हाती घेतला आहे. टॉवर्समधून होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे नागरिक आजारी पडत आहेत त्यामुळे हे टॉवर्स रहिवासी इमारतींवरून हलवून मोकळ्या जागी व सरकारी इमारतींवर बसवावेत अशी मागणी संघटनेने केली आहे. हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने 2014 साली दिलेल्या स्थगितीमुळे अडकून राहिला आहे. त्यासाठी संघटना आता उच्च न्यायालयात जाणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून आतापर्यंत 40,000 रु. संघटनेने गोळा केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हे टॉवर्स रहिवासी इमारतींवरून हलविल्याशिवाय संघटना स्वस्थ बसणार नाही. या प्रश्नानंतर आम्ही सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न घेणार आहोत.

-Ads-

विवेक वेलणकर म्हणाले की, पेट्रोल दरवाढीला सरकार जबाबदार नाही. असे सांगून केंद्र व राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत आहेत. या दरवाढीवर सरकारचे कोणतेच नियंत्रण नाही. सर्व पेट्रोल कंपन्या सरकारी असताना त्या कधीही दर वाढवत आहेत. राज्य सरकारने महसूलवाढीसाठी पेट्रोलवर दुष्काळ सेस बसवला. त्यानंतर दुष्काळ संपला तरी हा सेस चालूच आहे. ऑईल कंपन्यांवर सरकार कोणतेही नियंत्रण ठेवू इच्छित नाही. त्यामुळे सतत दरवाढ करून त्यांचा नफा 70% ने वाढला आहे. मागच्या केवळ 1 वर्षात या कंपन्यांनी 51,000 कोटी रु. नफा कमावला. या नफेखोरी विरुद्ध संघटितपणे आवाज उठविण्याची गरज आहे.

मेळाव्याला सुमारे दोनशे नागरिक उपस्थित होते. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. सुरुवातीला संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यात त्यांनी जागरूक नागरिक संघटनेच्या स्थापनेपासून आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला. मोबाईल टॉवर्समधून होणारा किरणोत्सर्ग या विषयातले तज्ज्ञ मिलिंद बेंबळकर या विषयावर बोलताना म्हणाले, सरकारच्या किंवा कंपन्यांच्या प्रकल्पाबाबत “नाही’ म्हणण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसांना मिळाला पाहिजे. आजूबाजूच्या 70% नागरिकांची संमती असल्याशिवाय टॉवर बसवले जाऊ नयेत. सध्या राजस्थान सरकार अशा प्रकारची नागरिकांच्या सहमतीची प्रक्रिया राबवत आहे. महाराष्ट्रातही तसेच व्हायला पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गुणवंत चिखलीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, गेल्या 70 वर्षात आपण बरीच प्रगती केली. तरीही सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच आहेत. याचे कारण भ्रष्टाचार संगनमताने होतोय. त्यासाठी अशा प्रकारच्या संघटनांचा एक दबावगट तयार झाला पाहिजे. या मेळाव्यात ग्राहक पंचायतीने रमेश सरदेसाई यांचेही भाषण झाले. संघटनेच्या सुभाष राणे, मनोहर पद्मन, सुभाष गुगळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. संघटनेचे खजिनदार गोकुळ बंगाळ यांनी देणगीदारांची यादी वाचून दाखविली. जगन्नाथ वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. बिपीन कडूसकर यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी रामचंद्र घिगे, बाळकृष्ण बोवा, एकनाथ पाठक, अरुण सपाटे यांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)