मोबदला मिळेपर्यंत रेल्वे काम बंद पडणार

तारगाव परिसरात शेतकऱ्यांचा रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव

राहिमापूर – जमिनीचा योग्य मोबदला मिळेपर्यंत रेल्वे दुपदरीकरणाचे काम होऊन देणार नसल्याचा इशारा तारगाव परिसरातील शेतकर्यांनी दिला आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांना उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांना तारगाव रेल्वे स्टेशनवरच संतापलेल्या शेतकर्यांनी घेराव घातला होता.

सध्या पुणे- मिरज रेल्वेचे दुपदरीकरणाचे काम सुरु आहे. परंतु शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी व संपादनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तसेच शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न देता जमीन ताब्यात घेऊन दुपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये रेल्वे लगत असणाऱ्या शेतकर्यांच्या पिकांचे, जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोजमाप न करता जमिनीत रेल्वे अधिकाऱ्यांनी मालकी हक्काचे खांब रोवले आहेत. यामध्ये पिकाऊ जमिनी, विहिरी, फळझाडे, जनावरांचे गोठे उध्वस्त होत आहेत. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर रेल्वे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे.

या संदर्भात कराड, कोरेगाव तालुक्‍यातील शेतकर्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून कोरेगाव प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. त्यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना संपादनाची कागदपत्रे शेतकऱ्यांना देण्यासाठी सांगितले होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी संबंधीत शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन-तीन वेळा बैठकीसाठी बोलवण्यात आले. परंतु कागदपत्रे दाखवली किंवा दिली नाहीत.

गुरवारी सकाळी अकरावाजता तारगाव रेल्वेस्टेशन येथे सर्व शेतकऱ्यांना बोलवण्यात आले होते. रेल्वेचे शिंदे व तोरापे हे अधिकारी त्यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांची जमीन संपादित केलेली कोणतीही कागदपत्र न दाखवता शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नानां ते उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागले. या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तुमच्याकडे असलेली कागदपत्रे दाखवा ,तुम्हीच रेल्वेच्या जागेत अतिक्रमण केले आहे असे सांगीतल्यावर शेतकरी संतापले आणि त्यांनी अधिकऱ्यांना घेराव घातला.

याबाबत बोलताना विकास थोरात म्हणाले, रेल्वेने आम्हाला 1970 सालापासून शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. गेल्या एक वर्षापासून रेल्वे दुपदरीकरणाचे काम सुरु आहे. यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे . शासनाने पुनर्वसनात दिलेल्या जमिनीवर सुद्धा रेल्वेने अतिक्रमण केले आहे. काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. रेल्वेचे दुपदरीकरण व्हावे परंतु शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा,अशी मागणी केली.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे म्हणाले, रेल्वे अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. अजून मोबदला मिळालेला नाही तेंव्हा रेल्वे प्रशासना विरोधात लढा उभारला जाईल. तसेच जमिनीचा मोबदला मिळेपर्यंत रेल्वे व दुपदरीकरणाचे काम बंद पाडण्यात येईल. यावेळी व्यंकटराव नलवडे,सुदाम चव्हाण, जयसिंग जाधव, भागवत घाडगे ,राजू शेळके, अनिल घराळ , रामचंद्र माने , वनिता माने , तसेच तारगाव टकले, बोरगाव, नलवडेवाडी, कालगाव, खराडे, कोपर्डे, आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)