मोबदला मिळेपर्यंत पैठण-पंढरपूर महामार्गाचे रुंदीकरण थांबवावे

पाथर्डी – पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग तालुक्‍यातील भालगाव परिसरातून जातो. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून, परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने काम बंद केले आहे. महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींची मोजणी होऊन मोबदला मिळेपर्यंत काम सुरू होऊ नये, अशी विनंती भालगाव व कासाळवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

तालुक्‍यातील पूर्व भागात असणाऱ्या भालगाव परिसरातून पैठण-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. महामार्गालगत असणाऱ्या शेतीची व घरांची कुठलीही मोजमाप न करता व नुकसानभरपाई न देता महामार्गाचे काम बेकायदेशीररीत्या सुरू असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद करून मोबदला मिळण्याची मागणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची, घरांची व झाडाझुडपांची कुठलीही दखल ठेकेदार कंपनीकडून घेतली जात नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातूनच हा मार्ग जाण्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या सर्व शेतीची, घरांची व झाडांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा होणे गरजेचे आहे. सदर मोजणी होऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळाल्याशिवाय पुढील काम सुरू होऊ नये.

निवेदनावर भगवान सानप, विक्रम सानप, अशोक सानप, महादेव खेडकर, सुनीता तांदळे, हरिभाऊ खेडकर, निवृत्ती खेडकर, माणिक खेडकर, प्रयागाबाई भाबड, मच्छिंद्र खेडकर, नवनाथ खेडकर, संजय खेडकर, पांडुरंग खेडकर, मनीषा खेडकर, नारायण खेडकर, प्रभावती खेडकर, शकुंतला सानप, यशोदा खेडकर, उत्तम पाखरे, बाबासाहेब पाखरे, सुनंदा आघाव, मंगल फुंदे, आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)