मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत – शिवसेनेला विश्‍वास

राहुल आणि प्रियंका यांचीही प्रशंसा

मुंबई -भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेने एक्‍झिट पोलवर भरवसा दाखवत नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. एक्‍झिट पोलमधून देशाचा कौल स्पष्ट होत असल्याचे त्या पक्षाने नमूद केले आहे.

एक्‍झिट पोलने वर्तवलेले अंदाज मान्य करण्यास विरोधक तयार नाहीत. मात्र, शिवसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून निकाल एक्‍झिट पोलच्या अंदाजांप्रमाणेच असतील, असे एकप्रकारे सूचित केले आहे. आम्ही मतदानानंतरच्या चाचण्यांवर (एक्‍झिट पोल) जाऊ इच्छित नाही. मात्र, लोकांचा जो उत्साह आम्ही पाहिला त्यावरून महाराष्ट्राचा कल आणि कौल स्पष्टच झाला होता. पुन्हा एकदा मोदींचेच सरकार येईल, हे सांगण्यासाठी कुणा पंडिताची गरज नव्हतीच. यंदाची निवडणूक जणू लोकांनीच हातात घेतली आणि मोदींना भरूभरून मतदान केले, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची प्रशंसाही अग्रलेखात करण्यात आली आहे. राहुल आणि प्रियंका यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. कॉंग्रेसला मजबूत विरोधी पक्ष बनवण्यात ते यशस्वी होतील. मागील निवडणुकीत त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्षनेता नेमता येईल इतके खासदारही निवडून आणता आले नव्हते. यावेळी लोकसभेत कॉंग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल. तेसुद्धा राहुल यांचे यशच मानावे लागेल, अशी टिप्पणी अग्रलेखात करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here