मोदी सरकार विदेशात स्वस्तात इंधन निर्यात करतेय

विदेशात 34 रूपये दराने पेट्रोल आणि 37 रूपयांनी निर्यात होतेय डिझेल !


कॉंग्रेसचा दावा

नवी दिल्ली – भारतीय नागरीकांना प्रचंड महाग किमंतीत पेट्रोल, डिझेल विकणारे मोदी सरकार अन्य देशांना मात्र अत्यंत स्वस्तात इंधन निर्यात करीत असल्याचा दावा कॉंग्रेस पक्षाने केला आहे. इंधनदरवाढीने त्रस्त झालेल्या नागरीकांनी याबद्दल मोदी सरकारला निवडणुकीत चांगला धडा शिकवला पाहिजे असे आवाहनही कॉंग्रेस पक्षाने केले आहे.

कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की मोदी सरकारने इंधनावर प्रचंड कर लाऊन देशातील नागरीकांची तब्बल 11 लाख कोटी रूपयांची लूट केली आहे. हे सरकार अन्य 15 देशांना केवळ 34 रूपये दराने पेट्रोल आणि 39 देशांना 37 रूपये दराने डिझेलची निर्यात करीत आहे.

माहिती अधिकारात ही माहिती उपलब्ध झाली आहे असे सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. भारत ज्या देशांना अत्यंत स्वस्त दरात हे इंधन विकत आहे त्यात इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इस्त्रायल या श्रीमंत देशांचाही समावेश आहे. या कृतीने मोदी सरकारने भारतातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला असून त्यांनी लोकांचा विश्‍वासघात केला आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की जुलै 2017 मध्येच आम्ही इंधन जीएसटीत आणा अशी मागणी सरकारकडे केलूी होती पण त्यांनी ती ऐकली नाही.

त्यांनी सांगितले की मे 2014 मध्ये पेट्रोलवर केवळ प्रति लिटर 9.2 रूपये इतके उत्पादन शुल्क आकारण्यात येत होते ते आता प्रति लिटर 19 रूपये 48 पैसे इतके झाले आहे. त्याच प्रमाणे डिझेलवर मे 2014 रोजी प्रति लिटर 3 रूपये 46 पैसे इतके उत्पादन शुल्क होते ते आता 15 रूपये 33 पैसे इतके आकारले जात आहे. भाजप सत्तेवर आल्यापासून 12 वेळा इंधनावरील उत्पादन शुल्क वाढवले गेले.

इंधन दरवाढीमुळे जीवनावश्‍यक वस्तुंच्या किंमती भरमसाठ वाढल्या असून या लुटीबद्दल जनता आता या सरकारला क्षमा करणार नाहीं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)