मोदी सरकार उलथवण्याचा चौघांचा प्रयत्न : स्वामींचा दावा

मुंबईत 8 जुलैला कारस्थान करणार उघड
नवी दिल्ली – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कमजोर बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदी सरकार उलथवण्याचे कारस्थान चौघांच्या टोळीने रचले आहे, असा खळबळजनक दावा आज भाजपचे खासदार सुब्रमण्यन्‌ स्वामी यांनी केला.

बेधडक आणि खळबळजनक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे स्वामी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. संबंधित कारस्थानाबद्दल लगेचच काही माहिती देण्याचे त्यांनी टाळले. मात्र, 8 जुलैला मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात संबंधित कारस्थान उघड करणार असल्याचे त्यांनी म्हटले. स्वामींच्या निशाण्यावर स्वपक्षाचेच काही नेते असल्याचेही सूचित झाले. नॅशनल हेराल्ड घोटाळा, एअरसेल-मॅक्‍सिस व्यवहार यांसारख्या अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीत अडथळे आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भाजपमधील काही घटकांनी कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) अधिकारी राजेश्‍वर सिंह यांच्यावरील गंभीर आरोपांची चौकशी करण्याची मोकळीक सरकारला असल्याचा निर्वाळा आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर स्वामी यांनी वरील आरोप केला. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या 2जी स्पेक्‍ट्रम वाटप घोटाळा आणि एअरसेल-मॅक्‍सिस व्यवहाराची चौकशी सिंह करत आहेत. सिंह हे प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही स्वामींनी केला.

सिंह यांच्याशी संबंधित प्रकरणात स्वामींनीही याचिका दाखल केली होती. दरम्यान, स्वामी राजकीय कारस्थानाबाबत काय बोलणार याची उत्सुकता बळावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)