मोदी सरकारने संसदेचे महत्व कमी केले- खा.सुळे

अकोले – मोदी सरकार अगोदर वटहुकुम काढते, मग त्याचे कायद्यात रुपांतर करते. त्यामुळे हे सरकार संसदेचे महत्व कमी करत आहे, असा हल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर चढवला.
आज सकाळी येथील माहेश्वरी सभागृहात “सुसंवाद’ या कार्यक्रमाखाली व्यापारी, डॉक्‍टर,केमिस्ट, इंजिनिअर, वकील अन्य नोकरदार यांचा संयुक्त मेळावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केला होता. तेव्हा त्यांच्या अडचणी व समस्या समजून घेताना खा. सुळे बोलत होत्या. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी व्यापारी विजय बूब होते. तर माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ.वैभवराव पिचड, सीताराम गायकर, मधुकरराव नवले, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, गिरजाजी जाधव, अमृता कोळपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, अमेझोन, फ्लिपकार्ट वा अन्य मोठ्या कंपन्यांच्या ऑनलाईन औषध खरेदीमुळे गर्भपात, भ्रुणहत्या वाढतील. डॉक्‍टर निगराणीखाली औषधे न दिले गेल्यास औषधाचा गैरवापर होईल. व पेशंट दगावण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकेल, अशी भीती व्यक्‍त करून तंत्रज्ञानाचा चांगला वापर अपेक्षित आहे. अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. इंडियन मेडिकल असोसिएशनने यात लक्ष घातले पाहिजे. त्यामुळे मोठे दवाखाने टिकतील. छोटे बंद पडतील असा इशाराही त्यांनी दिला. निलेश गायकर या युवकाने बीएसएनला अडचणी व जीओला भरपूर सवलती असा तक्रारीचा सूर लावला. तेव्हा सुळे यांनी खासगीकरणाला विरोध नाही. मात्र एकाला डावलून दुसऱ्याला संधी देताना सरकारी कंपनी बंद पडणार नाही याकडे लक्ष दिले गेले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी आ.पिचड यांनी नोटबंदी, जीएसटी, उद्योग जगताच्या अडचणी मांडून या सर्व प्रकरणी व्यापारी व सर्व अडचणीत आले आहेत. असे स्पष्ट केले. सरकारी धोरणावर व इंधन दरवाढीवर त्यांनी टीका केली. अरुण रुपवते, वकील बाळासाहेब वैद्य, डॉ.अनिल वाघ, सचिन शिंदे, विकास शेटे, अक्षय पोखरकर, किशोर देशमुख, निलेश गायकर व भाऊसाहेब नाईकवाडी आदींनी विविध समस्या मांडल्या. प्रास्ताविक व स्वागत मधुकरराव नवले यांनी केले. तर अमोल वैद्य यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)