मोदी सरकारची चार वर्ष विश्वासघाताची – कॉंग्रेस

आताची परिस्थिती उत्सव साजरे करण्यासारखी नसून शोक व्यक्त करणारी


कॉंग्रेसची घणाघाती टिका

 

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या चार वर्षाच्या सत्ताकाळात जनतेचा विश्वासघात केला आहे. गेल्या चार वर्षात या सरकारने निर्माण केलेली परिस्थिती उत्सव साजरे करण्यासारखी नसून शोक व्यक्त करणारी आहे, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे.

केंद्रातील मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमिवर मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ. सिंघवी यांनी आकडेवारी देऊन मोदी सरकारच्या खोट्या जाहिरातबाजीचा पंचनामा केला. या पत्रकारपरिषदेला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस पृथ्वीराज साठे, सचिव जिशान अहमद उपस्थित होते.

डॉ. सिंघवी म्हणाले, मोदी सरकारने गेल्या चार वर्षात देशातल्या नागरिकांचा विश्वासघात करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याशिवाय कोणतेही काम केले नसून चार वर्षपूर्तीचा उत्सव नव्हे तर शोक केला पाहिजे, अशी परिस्थिती आहे. युपीए सरकारच्या काळात कृषी विकास दर 4.2 होता तो मोदी सरकारच्या काळात 1.9 टक्क्‌यांवर आला आहे. मोदींनी उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के अधिक हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर तीनच महिन्यात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून तो देणे शक्‍य नाही, असे सांगून देशातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.

देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना सरकारने पाकिस्तानातून 15 हजार मेट्रीक टन साखर आयात केली. मोदींनी दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नोटाबंदीमुळे 15 लाख नोकऱ्या गेल्या. अनेक बड्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे, असे सांगतानाच देशातील विद्यापीठात विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचे काम सुरु आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

परदेशातला काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रूपये देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. त्यांच्या सरकारच्या चार वर्षाच्या काळात काळा पैसा तर आला नाहीच उलट नीरव मोदी, विजय माल्या मेहुल चोक्‍सीसारखे लोक घोटाळे करून देशातील बॅंकांचे 61 हजार कोटी रूपये घेऊन देशाबाहेर पळाले. त्यांच्यावर हे सरकार काहीच कारवाई करीत नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

सर्वच आघाड्यांवर अपयशी…
राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा झाला असून देशाचे 41 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी आकडे पाहिल्यावर मोदी सरकार गेल्या चार वर्षात सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले असून ही उत्सव साजरा करण्याची नाही तर दुःख व्यक्त करण्याची वेळ आहे, असे डॉ. सिंघवी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)