मोदी लवकरच करणार केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, अशी शक्‍यता बळावली आहे. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य असणाऱ्या एम. वेंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतिपदी निवड निश्‍चित मानली जात आहे. त्यामुळे दोन महत्वाच्या खात्यांना मंत्री राहणार नसल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचे पाऊल अटळ मानले जात आहे.
नगर विकास आणि माहिती व प्रसारण या खात्यांची जबाबदारी सध्या नायडू सांभाळत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील

केंद्रातील सत्तारूढ आघाडीने (एनडीए) त्यांना उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. जवळपास निश्‍चित असणाऱ्या निवडीपूर्वीच ते केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्‍यता आहे. याशिवाय, संरक्षण आणि पर्यावरण यांसारख्या महत्वाच्या खात्यांना पूर्णवेळ मंत्री नाही. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारण्यासाठी मनोहर पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनिल दवे यांचे मेमध्ये निधन झाले. त्यामुळे अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे संरक्षण खात्याचा तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे पर्यावरण खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

आता नायडू यांच्याशी संबंधित घडामोडीमुळे आणखी दोन खात्यांच्या जबाबदारीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यातून मोदी मंत्रिमंडळ विस्ताराला पसंती देतील. संसदेचे पावसाळी अधिवेशन समाप्त झाल्यानंतर हा विस्तार होण्याची शक्‍यता आहे. त्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, अशी माहिती भाजपच्या सुत्रांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)