मोदी मंत्रिमंडळात शरद पवारांचा समावेश? चर्चांना उधाण

राष्ट्रवादीकडून इन्कार

नवी दिल्ली -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून पवार यांच्या संभाव्य समावेशाचा इन्कार करण्यात आला आहे.

चालू आठवड्यात मोदी मंत्रिमंडळाची फेररचना होण्याची शक्‍यता आहे. या फेररचनेवेळी भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीत (एनडीए) सहभागी झालेल्या जेडीयूला आणि एनडीएत सहभागी होण्याची शक्‍यता असलेल्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळेल. स्वत: पवार यांनाच केंद्रीय मंत्रिपद दिले जाईल, असे वृत्त काही इंग्रजी माध्यमांनी दिले आहे. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी संबंधित वृत्त फेटाळून लावले. राष्ट्रवादी केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना कुठलाही आधार नाही, असे ट्‌विट त्यांनी केले.

याआधी केंद्रात नगरविकास खाते सांभाळणारे एम.व्यंकय्या नायडू देशाचे उपराष्ट्रपती बनले आहेत. तर केंद्रीय अर्थमंत्री संरक्षण खात्याचा अतिरिक्त भार सांभाळत आहेत. या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी पूर्णवेळ मंत्र्यांकडे सोपवणे निकडीचे बनले आहे. त्यातून मोदी मंत्रिमंडळाची फेररचना अनिवार्य बनल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिमंडळाची फेररचना करताना मोदी क्षमतेला महत्व देणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. त्यातून पवार यांचे नाव पुढे आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या दहा वर्षांच्या राजवटीत पवार यांनी केंद्रीय मंत्रिपद भुषवले. मात्र, केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेवर आल्यापासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमधील संबंध फारसे मधुर राहिले नसल्याचे चित्र आहे. याउलट, मोदी आणि पवार यांच्यात अतिशय चांगले संबंध आहेत. यापार्श्‍वभूमीवर, केंद्रीय मंत्रिपदासाठी पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)