मोदी मंत्रिमंडळाची फेररचना चालू आठवड्यातच?

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची फेररचना चालू आठवड्यातच होईल, अशी जोरदार चर्चा आहे. अशातच फार काळ संरक्षण खाते सांभाळावे लागणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिलेले संकेत आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज बोलावलेली उच्चस्तरीय बैठक या घडामोडींमुळे मंत्रिमंडळ फेररचनेच्या चर्चांना आणखीच खतपाणी मिळाले आहे.

मोदी रविवारी ब्रिक्‍स परिषदेसाठी चीनला रवाना होणार आहेत. त्याआधीच मंत्रिमंडळाची फेररचना होईल, असे मानले जात आहे. यापार्श्‍वभूमीवर, शहा यांनी जेटली यांच्यासह 8 केंद्रीय मंत्र्यांशी एका बैठकीत चर्चा केली. मंत्रिमंडळ फेररचनेच्या मुद्‌द्‌यावर त्यात चर्चा झाल्याची कुजबूज सत्ताधारी गोटात आहे. अशातच पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना जेटली यांनी फार काळ संरक्षण खाते सांभाळावे लागणार नाही असे वाटते, असे सूचक वक्तव्य केले.

शहांनी बोलावलेली बैठक गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा करण्याबाबत असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. भाजपने जेटली यांच्यावर गुजरात निवडणुकीसाठी प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, जेटली यांच्या सूचक वक्तव्यातून लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची फेररचना होण्याचे संकेत मिळत आहेत.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यासाठी मनोहर पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पूर्णवेळ संरक्षणमंत्री नेमण्यात आलेला नाही. या खात्याचा अतिरिक्त भार जेटली यांच्यावर सोपवण्यात आला आहे. अलीकडेच माजी केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतिपदी निवड झाली. ते सांभाळत असलेल्या महत्वाच्या नगरविकास खात्यालाही पूर्णवेळ मंत्री नाही.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूने काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्तारूढ आघाडीत (एनडीए) प्रवेश केला. त्या पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागणार आहे. याशिवाय, अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत दोन रेल्वे रूळांवरून घसरण्याच्या दुर्घटना घडल्या. त्यामुळे व्यथित झालेल्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, मोदींनी त्यांना थोडे थांबा अशी सूचना केली. या सर्व घडामोडींमुळे मोदी मंत्रिमंडळाची फेररचना अटळ मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)