‘मोदीमुक्‍त भारत’

 सत्‌-असत्‌

नुकताच गुढीपाडवा होऊन गेला. गुढीपाडवा म्हणजे नववर्षारंभ. त्यादिवशी संकल्पाची गुढी उभी करायची असते. त्यामुळे आम्हाला अंमळ इतरांपेक्षा जास्तच उत्साह असतो. परवाच्या गुढीपाडव्यालाही असेच झाले. नववर्षानिमित्त अनेक संकल्प सोडायचे म्हणून आम्ही त्यादिवशी जरा लवकरच उठलो. आजपर्यत प्रत्येक गुढीपाडव्याच्या दिवशी इतके संकल्प सोडले आहेत की, आता एकही संकल्प उरला नाही; म्हणून आम्ही आता इतरांचा संकल्प पूर्ण करण्याच्या मार्गाला लागलो आहोत. आपले नाही तर नाही, निदान इतरांचे तरी संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, हाच त्यामागचा आमचा उदात्त हेतू होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी कोण कोण काय संकल्प करतो याच्या मागावर होतोच. कृष्णकुंज गडावरच्या राजेंनी आठच दिवसांपूर्वी आपल्या मावळ्यांसमोर बोलताना जाहीर केले होते की, मी जे काही बोलणार ते गुढीपाडव्याच्या दिवशी. (मागच्या वर्षी कौटुंबिक कारणामुळे राजेंना आपला संकल्प जाहीर करता आला नव्हता. त्यामुळे त्यांचे अख्खे वर्ष ‘भाकड’ गेले होते.) शिवाय पाडव्याच्या दोनच दिवस आधी राजेंनी बारामतीकर काकांशी गुफ्तगू केल्याची वार्ता आली होती. त्यामुळे आमच्यासह महाराष्ट्रातील तमाम मातांना आणि बंधुभगिनींना उत्सुकता होती की, गुढीपाडव्याच्या दिवशी राजे नेमके काय बोलणार? त्यादिवशी कधी एकदा सायंकाळ होते आणि राजेंचे घणाघाती वक्‍तव्य कधी ऐकायला मिळते असे आम्हाला झाले होते त्यामुळे आम्ही टीव्हीसमोर ठिय्या दिला होता. त्या नादात आम्ही घरातील गुढी उतरायचीही विसरून गेलो. सहा वाजले, सात वाजले तरी राजे येण्याची वर्दी देणारे बिगुल वाजत नव्हते. अखेर आठ वाजता बिगुल वाजू लागले. मोठे जयघोष होऊ लागले त्या आवाजातच राजे व्यासपीठावर आले आणि त्यांची रसवंती बरसू लागली… बोलण्याच्या ओघात राजेंनी भारताच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केला.

राजे म्हणाले, भारताला 1947 साली पहिले स्वातंत्र्य मिळाले. (आपले चुकले की काय असे वाटून ‘बरोबर ना, असे म्हणून त्यांनी तमाम पब्लिककडून ‘हो..’ असे वदवूनही घेतले), दुसरे स्वातंत्र्य 1977 साली म्हणजे आणीबाणीनंतर मिळाले आणि आता तिसरे स्वातंत्र्य 2019 साली मिळणार आहे. मात्र, त्यासाठी भारत ‘मोदीमुक्‍त’ झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे असे त्यांनी जोरदार आवाहन केले. त्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किती खोटारडे आहेत त्यांनी आपल्याला गुजरातला बोलावून, ‘दाखविले एक आणि झाले भलतेच’ अशी फसवणूक कशी केली याचा पाढाच वाचला. अशा मोदींपासून भारत मुक्‍त झाला तरच भारताला भवितव्य आहे असे सांगून त्यांनी ‘मोदीमुक्‍त भारता’चा संकल्प जाहीर केला आणि या संकल्पपूर्तीसाठी सर्वांना सहकार्याचे आवाहन केले.

… राजेंचे ते आवेशपूर्ण भाषण ऐकून आम्ही इतके भारावून गेलो की, राजेंच्या या संकल्पपूर्तीसाठी आम्ही त्यांना सहकार्य करण्याचे ठरविले. आमच्या मनात एक झकास आयडिया आली. आम्ही आमच्या एका ओळखीच्या एका स्थानिक व्यंगचित्रकाराला बोलावून त्यांच्याकडून भारताचा नकाशा काढून घेतला आणि त्या नकाशात आजपर्यंत देशाचे पंतप्रधानपद भूषविलेल्या सर्व नेत्यांची चित्रे काढून घेतली मात्र नरेंद्र मोदींचे चित्र काढलेच नाही.

हे चित्र घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तडक “कृष्णकुंज’ गाठले. मात्र, आम्हाला प्रवेशद्वाराजवळ बराच वेळ तिष्ठत बसावे लागले. बऱ्याच वेळानंतर आम्हाला कसाबसा प्रवेश मिळाला आणि आम्ही ते चित्र त्यांना दाखविले आणि ‘मोदीमुक्‍त भारता’चे स्वप्न असे साकार होऊ शकते, हेही सांगितले. आमच्या हातातील ते चित्र पाहून, राजे म्हणाले, “अरे, खरेच की, आम्ही पण एक चांगले व्यंगचित्रकार आहोत. मात्र, आम्हाला ही आयडिया आजवर कशी सुचली नाही. मी पण एका फटक्‍यात असा ‘मोदीमुक्‍त भारत’ करू शकतो. त्यासाठी भाषणाची एवढी तयारी करण्याची आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची काय गरज आहे?’ असे म्हणून त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले आणि आम्ही हळूच तेथून काढता पाय घेतला…

– सत्यश्री


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)