मोदींना “आरएसएस’चे संविधान आणायचेय- आबू आझमी

समाजवादी पक्षाचे आबू आझमी यांचा आरोप : “एमआयएम’सह “मनसे’वर जोरदार टीका

नगर: “”देश बदल रहा है, प्रगती कर रहा है…’ हे भारतीय जनता पक्षाचे घोषवाक्‍य आहे. देश खरचं बदलला आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाननुसार कारभार करत आहे का? असे प्रश्‍न उपस्थित करून या सरकारच्या काळात बोलण्याचा अधिकार राहिला नाही. तिथे लोकशाही काय जिवंत राहणार? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलून “आरएसएस’चे संविधान आणायचे आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या सरकारची कार्यवाही सुरू झाली आहे,’ असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार आबू आझमी यांनी केला आहे. अहमदनगर आणि धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार आबू आझमी हे नगर दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे उमेदवार यावेळी उपस्थित होते.

आबू आझमी म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने देशात आता श्रीरामाच्या मंदिरावरून राजकारण सुरू केले आहे. परंतु कोणताही धर्म हा धर्मद्वेष शिकवत नाही. मशिदच्या ठिकाणावर मंदिर आणि मंदिराच्या ठिकाणावर मशिद बांधणे हे कोणत्याही धर्मात सांगितलेले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र “आरएसएस’च्या माध्यमातून ते करू पाहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली संविधान बदलण्याचा घाट नरेंद्र मोदी यांनी घातला आहे. मोदी यांना “आरएसएस’चे संविधान देशात लागू करायचे आहे.’ समाजवादी पक्ष मात्र देशाची लोकशाही आणि त्याचे संरक्षण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला कोणालाही धक्का लावू देणार नाही. भारतीय जनता पक्षाने धर्माच्या नावाखाली सुरू केलेले हे राजकारण मूळापासून उखडून फेकून देईल, असाही इशारा आबू आझमी यांनी दिला. भारतीय जनता पक्षाबरोबर “एमआयएम’ने हातमिळवणी केली आहे. भाजपने स्क्रिप्ट लिहून द्यायची आणि त्यावर “एमआयएम’ने त्यावर ओरडायचे. हा प्रकार नुरा कुस्तीचा आहे. जनताच या नुरा कुस्तीचा डाव उधळून लावेल, असेही ते म्हणाले.

“भारतीय जनता पक्षाचे राजकारण हे धर्मावर आधारीत आहे. धर्माच्या नावावर देशातील हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद लावण्याचे प्रकार सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जाहिरनाम्यातील एकही घोषणेची पूर्तता केलेली नाही.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातील वारासणी देखील मागासलेले आहे. गंगा साफ नाही. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. नोटबंदीनंतर दहशतवादी हल्ले थांबतील, ते होण्याऐवजी देशाच्या सीमारेषेवर दहशतवादी हल्ले सुरूच आहे. डॉलरचा दबाव कायम आहे. नोटबंदीमुळे एका फटक्‍यात 5 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. मेक इन इंडियाच्या नावाखाली श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहे. गरीब आणि अल्पसंख्यांक यांच्यावर बेरोजगारीच्या कुऱ्हाड तुटली आहे. त्यांच्या भावनांशी खेळले जात आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास काही दिवसानंतर लघु उद्योजकांचे मालक आणि त्यांच्या कामगारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरलेले हे सरकार फक्त धनिक धार्जिण्य आहे, असाही आरोप आबू आझमी यांनी केला.

आरक्षणाच्या आडून भाजपचे मतांचे राजकारण

मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा होता. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्याप्रमाणात आहे. तो मतपेढीवर प्रभाव पाडेल, हे लक्षात घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा केला आहे. मुस्लिम समाज हा अल्पसंख्यांक आहे. तो आरक्षणाच्या मुद्यातून जाणिवपूर्वक वगळला. मराठा समाजाला आरक्षणातून वगळले असते, तर येत्या निवडणुकीत भाजपच्या मतपेढीवर परिणाम झाला असता. मराठा समाजाप्रमाणेच मुस्लिम समाजाला देखील शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण द्यावे, अशी मागणी आबू आझमी यांनी केली. “एमआयएम’ मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयाचे दार ठोठावणार आहे. “एमआयएम’चा हा प्रकार म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा कायदा झाला आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजासाठी आरक्षणाचा कायदा होणे गरजेचे आहे. एमआयएम न्यायालयात जावून समाजाची दिशाफूल करत आहे, असेही ते म्हणाले. ब्राह्मण समाज देखील आरक्षण मागत आहे. त्यावर ते म्हणाले, “आर्थिकस्तर पाहून आता आरक्षणाचे निर्णय झाले पाहिजेत.’

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)