मोदींच्या राजवटीत 16 दहशतवादी हल्ले; 426 जवान शहीद : कॉंग्रेस

कॉंग्रेसकडून पलटवार: राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्‌द्‌यांवरून राजकारण करत असल्याची टीका 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 54 महिन्यांच्या राजवटीत 16 दहशतवादी हल्ले झाले. त्या कालावधीत पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये एकट्या जम्मू-काश्‍मीरात 426 जवान शहीद झाले. याशिवाय, 278 नागरिकांना त्या घटनांत जीव गमवावा लागला, अशी आकडेवारी देत कॉंग्रेसने दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावरून मोदींवर पलटवार केला.

मुंबईवरील महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांवेळी (26/11) देशात कॉंग्रेसची सत्ता होती, असे म्हणत मोदींनी एका सभेत त्या पक्षाला लक्ष्य केले. त्या टीकेचा समाचार कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी घेतला. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्‌द्‌यांवरून मोदी राजकारण करत आहेत. मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली. सरकारकडे कृतीचा आणि धोरणाचा अभाव असल्याने सीमेवर अशांतता असून अंतर्गत सुरक्षा स्थितीबाबत धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी म्हटले. 26/11 हल्ल्यांवेळी जवान लढत असताना आणि सर्व देश दहशतवादाविरोधात एकवटला असताना त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणारे मोदी घटनास्थळाबाहेर उभे राहून केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारवर टीका करत होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.

पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला. त्यांच्या पार्थिवांची विटंबना केली. मात्र, मोदी सरकार केवळ मूक साक्षीदार बनले. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानी सैनिकांकडून होणारा शस्त्रसंधीचा भंग 500 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. पाकिस्तानने 3 हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय हद्दीत मारा केला. 56 इंच छाती कुठे गायब आहे? पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी मोदींनी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला (आयएसआय) पाचारण का केले, असे सवालही सुर्जेवाला यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)