मोदींच्या नेपाळ शिष्टाईला धक्का? 

एकनाथ बागूल 

नेपाळमधील दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी युरोपीयन संघ राज्यास (यूई) दिलेल्या ग्वाहीमध्ये नेपाळ हा देश धर्मनिरपेक्ष असल्याचे निदर्शनास आणले. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांची संबंधित वक्तव्ये नेपाळला भारताऐवजी चीनच्या जास्त जवळ नेणारी ठरली असल्याचे मत परदेशी माध्यमांमध्ये व्यक्त होत आहे. 

परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या भेटीगाठींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदावर आरूढ झाल्यानंतर पहिल्या चार वर्षातच ज्या उत्साहाने वेगवान दौरे केले ते निःसंशय आश्‍चर्यचकित करणारे आहेत. अधिकृतरित्या देशाचे परराष्ट्रमंत्रिपद सुषमा स्वराज सांभाळत असल्या तरी परराष्ट्र संबंधातील सर्व महत्त्वपूर्ण निर्णय स्वतः पंतप्रधानच घेत आहेत, शिवाय परराष्ट्र खात्याला असणाऱ्या स्वतंत्र कॅबिनेट मंत्र्यांच्या मदतीसाठी दोन स्वतंत्र राज्यमंत्रीदेखील आहेत. भारताचे निवृत्त लष्करप्रमुख व्ही. के. सिंह आणि ज्येष्ठ इंग्रजी पत्रकार एम. जे. अकबर अशी त्यांची नावे आहेत. मोदी यांचा व्यक्तिगत प्रभाव परराष्ट्र खात्याप्रमाणेच अन्य सर्वच मंत्र्यांना नेमून दिलेल्या कामकाजावर देखील असल्याचे वेळोवेळी प्रसृत होणाऱ्या बातम्यांवरून लक्षात येते. पंधराच दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी सर्वाधिक निकटचा समजल्या जाणाऱ्या नेपाळ या शेजारी मित्र देशाचा दोन दिवसांचा दौरा केला. त्यावेळी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा-ओली आणि अध्यक्षांसह संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांचे भरपूर स्वागत केले. मोदी त्या अभूतपूर्व स्वागत सोहळ्याने कमालीचे भारावून गेले.

दरम्यान नेपाळ-भारत मैत्री, उभय देशांचे सांस्कृतिक जुने संबंध तसेच प्राचीन धार्मिक संबंधांचे जतन करण्याची दोन्ही पंतप्रधानांनी प्रकट केलेली इच्छा याचेही या दौऱ्याच्यावेळी नेपाळ आणि भारत या दोन देशांच्या गोटात प्रचंड कौतुक झाले. मात्र या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडीनंतर भारतीय प्रसिद्धी माध्यमांमधील मोदी यांच्या नेपाळ दौऱ्यांच्या फलिताबाबत झालेल्या देशव्यापी चर्चेला जबरदस्त धक्का देणारी बातमी नजरेपुढे आली. नेपाळमध्ये सध्या “युनायटेड मार्क्‍सिस्ट-लेनिनिस्ट या नावाच्या कम्युनिस्ट पक्षाची सत्ता असून उदारमतवादी कम्युनिस्ट नेता अशी ज्याची ओळख आहे ते के. पी. शर्मा ओली यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे आहेत. मात्र या पक्षाप्रमाणेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओईस्ट सेंटर) अशा नावाचा तेवढाच प्रभावशाली कम्युनिस्ट पक्ष या देशात असून पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड या नावाचा कट्टर माओवादी बंडखोर नेता या पक्षाचा सूत्रधार आहे. नेपाळच्या जंगलात दीर्घकाळ वास्तव्य करून याच कट्टर माओवादी-चीनवादी कम्युनिस्ट नेत्याने जुन्या राजेशाही राजवटीशी प्रदीर्घ काळ सशस्त्र लढा दिला होता.

राजेशाहीचा अतिशय क्रूर पद्धतीने अस्त झाल्यानंतर काही काळ प्रचंड यांनी देशाचे पंतप्रधानपदही सांभाळले होते. त्यावेळी त्यांनी भारतालाही भेट दिली होती. विशेष म्हणजे कट्टर कम्युनिस्ट विचाराचे के. पी. शर्मा ओली आणि कट्टर चीनवादी नेते प्रचंड हे नेते नेपाळच्या राजकारणाचे स्वतंत्रपणे नेतृत्व करीत असले तर शर्मा ओली हे मात्र उदारमतवादी समजले जातात, तर प्रचंड हे कट्टर चीनवादी, माओवादी म्हणून ओळखले जातात. अलीकडेच या दोन नेत्यांनी आपापले स्वतंत्रपक्ष (सीपीएन-युएमएल आणि सी. पी. एन. माओईस्ट सेंटर) एकमेकांमध्ये विलीन करण्याचा खळबळजनक निर्णय अचानक जाहीर केल्याचे आढळत आहे. या विलिनीकरणानंतर त्या देशाच्या नकाशावर “नेपाळ कम्युनिस्ट पार्टी’ नावाचा एकमेव राजकीय अस्तित्वात राहणार आहे. नेपाळच्या संसदेमध्ये असणाऱ्या 275 सदस्यांमध्ये 174 सदस्य संयुक्त कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत हे येथे उल्लेखनीय वाटते. आणखी वैशिष्ट्यपूर्ण घटना म्हणजे नेपाळी कम्युनिस्टांच्या ताज्या ऐक्‍य प्रदर्शनाचे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्तुळात ताबडतोब प्रचंड स्वागत झाले आहे.

दोन कम्युनिस्ट पक्षांचे विलिनीकरण आणि त्यामध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचाही समावेश तसेच या एकीकरणाचे चीनी सत्ताधाऱ्यांनी तातडीने केलेले उत्स्फूर्त स्वागत पाहून भारताच्या विद्यमान परराष्ट्र धोरणाच्या सूत्रधारांना निश्‍चितच धक्का बसला असणार यात तिळमात्र शंका नाही. स्वतः मोदी यांनी त्यांच्या ताज्या नेपाळ दौऱ्याच्या काळात त्या देशाच्या सर्वांगीण विकास योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि तांत्रिक स्वरुपात सहकार्य करण्याच्या वारंवार घोषणा केल्या. त्या संदर्भात काही अधिकृत करारदेखील केले. भारत-नेपाळ रेल्वे मार्गाच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी घसघशीत आर्थिक मदतीचाही संबंधित करारांमध्ये समावेश आहे. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे सत्ताधारी देखील नवीन रस्त्यांची उभारणी, काठमांडू ते शांघाय अशा रेल्वे मार्गांच्या उभारणीचा त्यामधील प्रस्ताव तसेच नदी, धरणे, वीज आदी प्रकल्पांसाठी नेपाळची आर्थिक व तांत्रिक स्वरुपाची मूलभूत गरज पूर्ण करण्याच्या संदर्भात आश्‍वासनांचा नेपाळ सरकारवर एव्हाना पाऊस पाडत आहे मोदी यांनी ताज्या नेपाळ भेटीमध्ये उभय देशांमधील प्राचीन सांस्कृतिक मैत्री संबंधाचा वारंवार उल्लेख करताना बौद्ध धर्म, रामायण आणि नेपाळमधील विविध हिंदू धार्मिक स्थळांचे महत्त्व याकडेही स्थानिक जनतेचे निरनिराळ्या कार्यक्रमात लक्ष वेधले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)