मोठ्या प्रमाणात घोडेबाजार चालू असल्यानेच निर्णय 

राज्यपाल मलिक यांच्याकडून विधानसभा बरखास्तीचे जोरदार समर्थन

जम्मू – जम्मू-काश्‍मीर विधानसभा बरखास्तीमुळे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनलेले राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. मोठ्या प्रमाणात घोडेबाजार चालू असल्याने ते पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्‍मीरमध्ये मागील 20 दिवसांपासून घोडेबाजार सुरू झाल्याच्या बातम्या माझ्याकडे येत होत्या. आमदारांना पैशांचे आमीष दाखवले जात असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या. याशिवाय, भिन्न राजकीय विचारसरणींच्या पक्षांना स्थिर सरकार देणे शक्‍य झाले नसते. कुठल्याही आघाडीला सरकार स्थापनेची संधी दिली असती तर आणखीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली असती. संवेदनशील राज्यात अस्थिरता निर्माण करण्याची आमची इच्छा नाही. राज्याचे हित पाहूनच कृती केली, असे मलिक येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. केंद्र सरकारच्या आदेशांवरून विधानसभा बरखास्तीचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. तसे असते तर पीपल्स कॉन्फरन्स, भाजप आघाडीला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले असते, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना विधानसभेची बरखास्ती हवी होती. मागील पाच महिन्यांपासून ते तशी मागणी करत होते. आता ते दुटप्पी भूमिका का घेत आहेत? हवे ते घडल्याचा आनंद त्यांना वाटायला हवा, असा शाब्दिक टोलाही मलिक यांनी लगावला. राजभवनातील फॅक्‍समशिन कार्यरत नसल्याने सरकार स्थापनेचा दावा करणारे पीडीपीचे पत्र राज्यपालांना मिळाले नाही. त्याबाबत विचारल्यावर बुधवारी ईद होती. त्यामुळे कार्यालये बंद असल्याची माहिती मेहबुबा आणि ओमर यांना असायला हवी होती, असे उत्तर त्यांनी दिले. पीडीपीचे पत्र सोशल मीडियावरही उपलब्ध होते, असे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी सोशल मीडिया सरकार स्थापन करते का, असा सवाल केला.

घोडेबाजाराची माहिती सार्वजनिक करा-ओमर अब्दुल्ला घोडेबाजार सुरू असल्याची आणि पैशांचा वापर झाल्याची माहिती राज्यपालांनी सार्वजनिक करावी, असे आव्हान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी राज्यपालांना दिले. घोडेबाजाराचा किंवा पैशांच्या वापराचा आरोप आम्ही केलेला नाही. राज्यपालच तसे म्हणत आहेत. पैशांचा वापर कुणी केला याची माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे. सरकार स्थापनेबाबतचा पीडीपीचा दावा फेटाळताना राज्यपालांनी भिन्न राजकीय विचारसरणींकडे बोट केले. त्यांनी तो प्रश्‍न सरकार स्थापनेसाठी 2015 मध्ये भाजप आणि पीडीपी एकत्र आले तेव्हा विचारला होता का, असा सवालही ओमर यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)