मोठ्या कंपन्या जास्त बेजबाबदार 

कर्ज 54 टक्‍के तर एनपीएतील हिस्सा 85 टक्‍क्‍यांवर 
मुंबई, दि.7-बॅंकांकडून दिलेल्या एकूण कर्जात मोठ्या कर्जदारांचा वाटा 54.8% असताना बॅंकेच्या ढोबळ एनपीएमध्ये या कर्जदारांचा हिस्सा 85.6% आहे. बॅंकांमधील एकूण कर्जात सर्वाधिक कर्जे घेतलेल्या 100 कर्जदारांचा हिस्सा 15.2% आहे. पण याच अव्वल 100 कर्जदारांचा एनपीएतील वाटा तब्बल 26% असल्याचे रिझर्व्ह बॅंकेनेही त्यांच्या अहवालात म्हटले आहे. यावरुन सर्वसामान्यांनी बॅंकेत विश्‍वासाने ठेवलेला पैसा उद्योजकांच्या खिशात घातला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
देशभरातील बॅंकांनी मागील दहा वर्षात तब्बल 4.80 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ (राइट ऑफ) केली आहेत. त्यामध्ये 1.23 लाख कोटी रुपयांसह स्टेट बॅंक ऑफ इंडिया अव्वल आहे. आयसीआरए या पतमानांकन देणाऱ्या कंपनीच्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.
अभ्यासानुसार, मार्च 2018 पर्यंत मागील दहा वर्षात कर्जे माफ करणाऱ्या पहिल्या 10 बॅंकांचा आकडा 3 लाख 25 हजार 987 कोटी रुपये आहे. स्टेट बॅंकेने 1 लाख 23 हजार 137 कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. या दहा बॅंकांमध्ये खासगी क्षेत्रातील ऍक्‍सिस व आयसीआयसीआय या दोन बॅंकासुद्धा आहेत. या दोन बॅंकांनी अनुक्रमे 11,688 व 9,110 कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत.
उद्योजकांना दिलेली कर्जे बुडित खात्यात गेल्यानंतर त्याची वसुली करण्याऐवजी ती माफ करण्याचा सपाटा सर्वच बॅंकांनी लावल्याचे या अभ्यासात दिसून येत आहे. सर्वाधिक 3.57 लाख कोटी रुपयांची कर्जे गेल्या चार वर्षांच्या काळात माफ करण्यात आली. त्यापैकी 1.44 लाख कोटी रुपयांची कर्जे 2017-18 या आर्थिक वर्षात (मार्च 2018 पर्यंत) माफ करण्यात आली. एकूण दहा वर्षात सरकारी बॅंकांनी 4 लाख 584 कोटी व खासगी बॅंकांनी 79 हजार 490 कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)