मोगरा फुलला…

अश्‍विनी महामुनी

कधी कधी मला संध्याकाळी घरी परतायला उशीर होतो. संध्याकाळी सहानंतर पुण्यात गाडी चालवणे म्हणजे एक कसरतच असते. पूर्वी काही ठराविक मार्गांवरच वाहनांची गर्दी असायची. आता सर्वच रस्त्यांवर, अगदी गल्लीबोळातूनसुद्धा नदीला पूर यावा तसा वाहनांचा-खास करून टू व्हीलर्सचा पूर आलेला असतो. संथ वाहते कृष्णामाई’ प्रमाणे ही वाहने एका गतीने जात नाहीत, तर “पळा पळा कोण पुढे पळे तो’ अशा अविर्भावात सुसाट सुटलेली असतात.

सर्वत्र माणसे कमी वाहने जास्त असा प्रकार असतो आणि नदीच्या प्रवाहाप्रमाणे वाहनांचा प्रवाह वाहता नसतो. त्यात अनेक अडथळे असतात, सिग्नलचे बांध घातलेले असतात आणि ट्रॅफिक जॅमचे भोवरेही असतात. अगदी डोळ्यात तेल घालून गाडी चालवावी लागते. कोण कोठून धूमकेतूसारखा उगवून तुमच्या मार्गात आडवा येईल हे काही सांगता येत नाही. परत चूक करणारेच मोठा आवाज करून आणि अपशब्दांचा पाऊस पाडत भांडायला तयार असतात. तेव्हा “गच्छ सूकर भद्रम ते’ म्हणून आपला मार्ग गोगलगायीच्या गतीने चालत राहायचा.

पण वाटेत काही चांगल्या गोष्टीही असतात. लकडी पुलाजवळच्या चौकात नेहमीच सिग्नलला थांबावे लागते. बराच वेळ. तेव्हा मात्र आजूबाजूला पाहण्यात वेळ चांगला जातो. रस्त्यात विविध वस्तू विकणारी मुले असतात. त्यात मोठी माणसे फार क्वचित दिसतात. कमी प्रमाणात दिसतात. मुले मात्र मोठ्या उत्साहाने सिग्नलला थांबलेल्या एका गाडीकदून दुसऱ्या गाडीकडे चपळाईने जात असतात. कधी त्यांच्या हाती पुस्तके असतात, कधी खेळणी असतात, कधी काही अन्य वस्तू असतात, गाडी पुसण्यापासून लागणाऱ्या पिवळ्या रंगांच्या फडक्‍यांपासून ते काचांना लावण्याच्या “शेड’पर्यंत……
पण मला सर्वात पाहावेसे वाटतात ते गजरे विकणारे. हातात मोगऱ्याचे गजरे घेऊन चौकात फिरणारी मुले-मुली अगदी न बोलता आपले काम करत असतात. बाईकवाले, रिक्‍शा आणि कारवाल्यांच्या समोर जाऊन गजरे दाखवायचे आणि खुणेनेच पाहिजे का विचारायचे. त्यांनी नाही म्हटले तर अगदी शांतपणे दुसऱ्या गाडीकडे जायचे. एखाद्या रिक्षात एखादे जोडपे असले तर हमखास मोगऱ्याचे गजरे घेतेच. कधी कधी अनेक गजरे घेते. केसात एकच गजरा घालण्यापेक्षा दोनचार गजरे घातले की कसे भरगच्च दिसते. एका मोगऱ्याच्या गजऱ्याने सौंदर्यात “चार चांद’ म्हणतात, तसे लागतात. भरगच्च केसांचा अंबाडा आणि त्यावर बांधलेला अर्धचंद्राकार गजरा म्हणजे मोठी जादू करणारी गोष्ट.

मोगरा विकणरी मुले समोर आली तरी काही कारवाले खिडकीची काचसुद्धा खाली करत नाहीत. ही मुले बाहेर मोगऱ्याचे गजरे दाखवत असताना अगदी मख्खपणे समोर पाहात असतात. जणू ते सुंदर, सुगंधी गजरे आणि गजरे विकणारी ती उत्साही मुले त्यांना दिसतच नाहीत. कधी एखाद्या कारमध्ये मात्र हौशी कुटुंब असते. ते दराची घासाघीस न करता एकदम मोठ्या संख्येने गजरे विकत घेऊन त्या मुलाला वा मुलीला खुष करून टाकते.

ही मुले मोगऱ्याची फुले घेतात कधी, त्यांचे गजरे करतात कधी हा मला अनेकदा प्रश्‍न पडतो. मी एका मुलीला सहज विचारले, तुम्ही गजरे कधी तयार करता? ती म्हणाली, आमच्यापैकी फार कमी जण स्वत: गजरे करतात, ते तसे वेळखाऊ काम आहे. त्यामुळे आम्ही तयार गजरे घेतो आणि विकतो. संध्याकाळी दोनतीस तासच हे काम चालते. गजरे विकणारांत अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनीही असतात. आपली आणि लोकांचीही संध्याकाळ सुगंधी आणि प्रसन्न करत ती आपल्या शिक्षणाला हातभार लावत असतात. हे समजल्यापासून मी न चुकता सिग्नलाला थांबले, की चारपाच गजरे विकत घेते. त्यांना एक वेगळाच सुगंध येतो. खरं तर गजरे अनेक प्रकारचे असतात, पण मोगऱ्याच्या गजऱ्याची गोष्टच न्यारी. जाईचे, जुईचे, अबोलीचे, सुरंगी, कुंदीचे….. किती तरी प्रकारच्या फुलांचे गजरे तयार करतात. सुरंगीच्या पिवळ्या फुलांचे गजरे कोकणातच मिळतात. इतका मादक सुगंध असतो त्यांचा की विचारायची सोय नाही. नुसता घमघमाट सुटलेला असातो. बाजारात विकायला आलेल्या सुरंगीच्या गजऱ्याभोवती पण भ्रमर गुंजी घालत असतात. पण मोगऱ्याची गोष्टच वेगळी. मोगरा फुलतो तेव्हा घरात आनंदही फुलतो. म्हणून घरात मोगऱ्याची फुले असावीतच. देव्हाऱ्यातही चार मोगऱ्याची फुले वाहिलेली असली की देव्हारा आणि देवघरही सुगंधी बनते, घर प्रसन्न बनते. मोगरा फुलला…… मोगरा फुलला…. असे म्हणून ज्ञानेश्‍वरांनी मोगऱ्याला अजरामर करून टाकले आहे. लता मंगेशकरच्या आवाजातील हे गाणे मोगऱ्याचा गंध भिनावा तसे चारही अंगानी जणू आपल्याला भारून टाकते. मग आपल्या मनातही मोगरा बहरतो. आणि आपले मन गुणगुणते…
मोगरा फुलला… मोगरा फुलला…


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)