मोकळ्या केलेल्या फुटपाथवर पुन्हा अतिक्रमणांची गर्दी

सातारा – गेल्या काही महिन्यांपूर्वीच शहरातील अतिक्रमणांवर पालिकेकडून मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई केली होती. मात्र, आता पुन्हा ही अतिक्रमणे जैसे थे’ दिसू लागल्याने तू कर मारल्यागत, मी करतो रडल्यागत’ अशीच काहीशी नौटंकी करुन पालिका आणि व्यावसायिकांकडून शहरतील नागरिकांची दिशाभूल सुरु आहे की काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अतिक्रमण मोहिमा आणि पुन्हा त्याच ठिकाणी होणारी अतिक्रमणे यामुळे पालिकेच्या कारभारावरही संशय व्यक्त होऊ लागला आहे.

राज्यात कोणत्याही शहरात जितक्‍या वेळा अतिक्रमण हटाव मोहिमा झाल्या नसतील तितक्‍या अतिक्रमण हटाव मोहिमा सातारा शहरात झाल्या असाव्यात. नुकतील गेल्या काही महिन्यांपूर्वी पालिकेने पोलीस फौजफाटा बरोबर घेऊन शहरातील अतिक्रमणांवर कारवाईचा हातोडा मारला होता. पालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात होते.

मात्र, पुन्हा अतिक्रमण होणार नाहीत याविषयी त्यांना शंकाही होतीच. आणि सध्याची शहरातील परिस्थिती पाहता नागरिकांची शंकाही रास्तच होती हे दिसून येत आहे. कारण, काही काळासाठी मोकळा श्‍वास घेतलेल्या सातारा शहरातील रस्त्यांवरील फुटपाथवर आता पुन्हा अतिक्रमणांनी डोकी वर काढत आपले व्यावसाय थाटले आहेत. दरम्यान, बसस्थानकापासून पोवईनाक्‍याकडे जाणाऱ्या मार्गावर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या फुटपाथवर विक्रेत्यांनी पुन्हा आपली दुकाने थाटल्याने व्यावसायिक फुटपाथवर अन्‌ नागरिक रस्त्यावर’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील राधिका रोड, तसे राजपथावरुन पालिकेच्या दारावरुन राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील फुटपाथवरही पुन्हा अतिक्रमणे बोकाळली आहेत.

राजपथावरील अतिक्रमणे सातारा पालिकेने नुकतीच हटवली होती. शहर विकास विभागाने राजलक्ष्मी थिएटरसमोरील फूटपाथ नुकताच मोकळा केला होता. अतिक्रमण विभागाचे शैलेश अष्टेकर व प्रशांत निकम यांचे अभिनंदन करण्याच्या आतच पुन्हा फूटपाथ जाम करण्याचा प्रयत्न होत आहे. मोती चौक ते राजवाडा ते मंगळवार तळे या भागात नो हॉकर्स झोन असताना फिरस्ते विक्रेते आणि टेंपोवाल्या फिरत्या भाजीमंडईने वाहतुकीची कोंडी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)