मोईन अलीकडून अपेक्षा उंचावल्या: जो रूट

साऊदम्पटन: भारतीय संघाचा चौथ्या कसोटी सामन्यात 60 धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी मिळवल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने विजयाचा शिल्पकार ठरलेला फिरकी गोलंदाज मोईन अलीचे कौतुक केले आहे. मोईनने इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला असल्याचे सांगून रूट म्हणाला की, चौथ्या सामन्यातील त्याची कामगिरी ही इंग्लंडसाठी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट म्हणून गणली जाईल. तसेच पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून देण्यासाठी मोईनकडून असलेल्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत.

मोईन अलीने चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत मिळून भारताच्या 9 गड्यांना तंबूत पाठवले. पहिल्या डावात त्याने 63 धावा देत भारताच्या 5 फलंदाजांना बाद केले. तर दुसऱ्या डावात 71 धावांमध्ये 4 गड्यांना बाद करत भारतीय संघाला पराभवाची चव चाखायला लावली. त्याचबरोबर पहिल्या डावात इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला असताना त्याने 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून सॅम करनच्या साथीत इंग्लंडचा डाव सावरला. या कामगिरीमुळे मोईनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मोईन अलीची प्रशंसा करताना रूट म्हणाला की, मोईनने दुसऱ्या डावात केलेली गोलंदाजी खूपच प्रभावी होती. त्याला आपली बलस्थाने माहीत होती. आपण कोठे चेंडू टाकला तर फलंदाज अडचणीत येतील हे तो जाणून होता. त्याने आमच्या रणनीतीनुसार गोलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले. तसेच कोहली आणि रहाणे यांचे बळी घेत संघाच्या विजयावर एकप्रकारे शिक्‍कामोर्तबच केले.

मोईन अली हा एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. परंतु फलंदाजीत त्याने बजावलेली कामगिरी केवळ अप्रतिम आणि अपवादात्मक होती, असे सांगून रूट म्हणाला की, संघाला जेव्हा आणि जेथे गरज भासेल, तेथे उपयोगी पडणाऱ्या मोईनसारख्या खेळाडूमुळे तुम्ही निश्‍चिंत राहू शकता. अशा खेळाडूचा आम्हाला बरेच दिवसांपासून शोध होता. वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकांमध्येही मोई’ला महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. या दोन्ही संघांमधील फलंदाज फिरकीला चांगल्या प्रकारे तोंड देतात. त्यामुळे मोईनवरील जबाबदारी वाढली आहे.
सॅम करन ही तर बहुमोल भेट

रूटने सॅम करनचेही कौतुक केले. करनचा खेळ प्रत्येक सामन्यागणिक सुधारत चालला आहे. त्याने या सामन्यात केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे संघाला सकारात्मकता प्राप्त झाली आहे. तो या मालिकेतून आम्हाला मिळालेली बहुमोल भेटच आहे, असे सांगून रूट म्हणाला की, करन त्याच्या वयाच्या मानाने खूप वरच्या दर्जाची कामगिरी करीत आहे. ज्याचा आम्हाला संपूर्ण मालिकेत फायदा झाला आहे. एखाद्या खेळाडूमध्ये इतक्‍या तरुण वयात कसोटी सामन्यावर प्रभाव पाडण्याची क्षमता असणे कौतुकास्पद आहे. करनचे भवितव्य निश्‍चितपणे उज्ज्वल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)