मॉलमधील पार्किंग होणार मोफत?

महापालिका आणणार धोरण : पोलिसांचीही घेणार मदत

– सुनील राऊत

-Ads-

पुणे- ग्राहकांच्या गैरसोयीचा फायदा घेत त्यांचे खिसे रिकामे करणाऱ्या मॉल चालकांना आता चांगलाच लगाम बसणार आहे. शहरातील प्रमुख मॉलमधील पार्किंग मोफत करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने संयुक्त धोरण केले जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांवरील पार्किंग समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

शहराच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून बांधकाम विभागाकडून हे धोरण आणि मॉलसाठीची “पार्किंग नियमवाली’ तयार करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, काही नागरिक खरेदीसाठी न येता दोन-दोन दिवस वाहने लावून जातात, अशा तक्रारी मॉल चालकांनी केल्या आहेत. त्यानुसार, अशा वाहनांसाठीदेखील या धोरणात नियमावलीही ठेवली जाणार आहे.

मुख्य सचिवांनी घेतली दखल
गेल्या सहा महिन्यांत शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता विचका झाला असून पुणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी थेट मुख्य सचिवांनी स्मार्ट सिटीच्या बैठकीत सर्व यंत्रणांनी एकत्रित येत तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना केल्या.

का आली निर्णय घेण्याची वेळ?
वाहतूक कोंडीची कारणे पोलिसांकडूनही शोधली जात आहेत. यात प्रमुख मॉल मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर असून मॉलमध्ये पार्किंगसाठी प्रतितास 10 ते 80 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने लावून खरेदीसाठी जात आहेत. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड कोंडी होत असल्याचे एक मुख्य कारण समोर आले आहे. तसेच पार्किंगच्या अवास्तव शुल्क वसुलीविरोधात नागरिकांनी महापालिका तसेच राज्य शासनाकडे तक्रारीही केल्या आहेत.

सुविधेऐवजी केली जातेय वसुली
शहरात सुमारे 22हून अधिक मोठे मॉल आहेत. हे व्यावसायिक बांधकामे असल्याने ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन त्यांनी संबंधित ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिकेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेऊन नंतर हे पार्किंग चक्क “पे अॅन्ड पार्किंग’ केले जाते. त्या ठिकाणी नागरिकांकडून अवास्तव शुल्क आकारले जाते. तसेच नागरिकांनी पैसे देण्यास नकार दिल्यास, पार्किंग भरल्याचे सांगून गाडी मॉलच्या आसपासच्या रस्त्यांवर लावण्याबाबत सूचना देतात. तर अनेकदा मॉलच्या पार्किंगचा वापर गोडाऊन म्हणून केला जातो. त्यामुळे नियमानुसार, मोफत असलेल्या या पार्किंगचा वापर मोफतच असावा यासाठी हे धोरण तयार करण्यात येत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

78
मॉल्सची एकूण संख्या


22
मोठ्या मॉल्सची संख्या


10-80 रु.
पार्किंगसाठी प्रतितास शुल्क

शहर सुधारणा समितीच्याही सूचना
मॉल चालकांकडून पार्किंगच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या वसुलीविरोधात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना शहर सुधारणा समितीनेही दिल्या आहेत. त्यानुसार, प्रशासनाकडूनही पार्किंगची माहिती संकलन सुरू आहे. त्यानुसार, शहरात 78 मॉल असून त्यात सर्वांत मोठे 22 मॉल असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)