मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन लेझर रन राष्ट्रीय स्पर्धा: महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद  

विराज परदेशी, अजिंक्‍य बालवडकर, ऋतुजाला सुवर्णपदक 
पुणे: महाराष्ट्र संघाने मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित पहिल्या लेझर रन राष्ट्रीय स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विराज परदेशी, अजिंक्‍य बालवडकर, ऋतुजाला यांनी सुवर्णपदक पटकावताना उत्कृष्ठ कामगीरी केली आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत सात राज्यातील एकूण 160 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतून राष्ट्रीय शिबिरासाठी आणि लेझर रन जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड होणार होती. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
सदर प्रकारातील जागतिक स्पर्धा डब्लिन येथे 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विराज परदेशीने वरिष्ठ गटात सुवर्णपदक मिळवले. यात 4 बाय 800 मीटर धावणे आणि 10 मीटर वरून शूटिंग याचा समावेश होता. विराजने 11 मिनिटे 43.33 सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक मिळवला. महाराष्ट्राच्या सौरभ पाटीलने (11 मि. 45.11 से.) रौप्यपदक, तर राकेश वेंडेने (11 मि. 53.15 से.) ब्रॉंझपदक मिळवले. ज्युनियर मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अजिंक्‍य बालवडकरने (11 मि. 25.94 से.) सुवर्णपदक पटकावले. त्याने मध्य प्रदेशच्या रवीसिंग पाल (11 मि. 35.66 से.,) आणि धरमेंद्रसिंग ठाकूर (11 मि. 36.16 से.) यांना मागे टाकले. रवी आणि धरमेंद्रला अनुक्रमे रौप्य आणि ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. वरिष्ठ महिला गटात बिहारच्या प्रतिमाकुमारी माहताला (13 मि. 6.20 से.) सुवर्ण, आंध्र प्रदेशच्या स्वाती के. हिला (16 मि. 47.78 से.) रौप्य आणि भारती ए. हिला (17 मि. 36.78 से.) ब्रॉंझपदक मिळाले.
स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा तळेगावकरने सुवर्णयश मिळवले. तिने 14 मिनिटे 55.13 सेकंद अशी वेळ नोंदवली. आंध्र प्रदेशच्या रिशिता श्री पी. हिला (18 मि. 50.09 से.) रौप्य आणि आरती प्रियाला एम. हिला (22 मि. 57.41 से.) ब्रॉंझपदक मिळाले. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या पार्थ खराटेने (11 मि. 54.60 से.) रौप्यपदकाची कमाई केली. स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या आर्यन पाटीलने (7 मि. 22.70 से.) रौप्य, तर लहुकुमार वाघुंडेने (7 मि. 31.67 से.) ब्रॉंझपदक मिळवले. या गटात 4 बाय 400 मीटर धावणे आणि 10 मीटर शूटिंगचा समावेश होता. मुलींच्या गटात पहिले तीन क्रमांक महाराष्ट्राच्या मुलींनी पटकावले. यात इफिया इक्कलवाले (8 मि. 8.62 से.), मैत्राली भंडारी (8 मि. 20.77 से.) आणि प्रिया चौगुले (8 मि. 34.59 से.) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि ब्रॉंझपदक मिळवले.
स्पर्धेतील 15 वर्षांखालील मुलींच्या गटात 4 बाय 400 मीटर धावणे आणि 7 मीटरवरून शूटिंग करणे असे प्रकार होता. यात महाराष्ट्राच्या अनन्या नामडेने (7 मि. 53.13 से.) सुवर्ण, मुग्धा वाव्हळने (7 मि. 53.52 से.) रौप्य आणि मनाली रतनोजीने (7 मि. 54.45 से.) ब्रॉंझपदक मिळवले. स्पर्धेतील 13 वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या मुलांनी वर्चस्व राखले. अर्जुन आडकरने (5 मि. 00.40 से.) सुवर्ण, शुभम देशपांडेने (5 मि. 29.87 से.) रौप्यपदक, तर अजिंक्‍य कुत्तरमारे (5 मि. 45.45 से.) याने ब्रॉंझपदक मिळवले. मुलींच्या गटात नंदिनी मेणकरने सुवर्ण, तर वैभवी भोईटेने रौप्यपदक मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण एशियन मॉडर्न पेंटॅथलॉन कॉन्फेडरेशनचे सचिव नामदेव शिरगावकर, मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी विठ्ठल शिरगावकर, विनय मराठे, जितेंद्र खासनिस, बाळासाहेब लांडगे, कमल गोस्वामी, अमित गायकवाड आदी उपस्थित होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)